
कश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पुराच्या पाण्याचे संकट ओढावले आहे. त्यातच आता जम्मू-कश्मीरमधील फळ मार्केट दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याने कश्मीरचे सफरचंद संकटात सापडले आहे. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय राजमार्ग (एनएच-44) वर फळांचे ट्रक अडकून पडले आहेत. त्यामुळे फळ मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सफरचंद खराब होत आहेत. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
श्रीनगर, सोपोर, अनंतनाग, शोपियां, कुलगाम आणि पुलवामा बाजारात फळ व्यापाऱ्यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व जम्मू-कश्मीर सरकारने राजमार्गाची खराब अवस्था झाल्याने, ट्रॅफिक जामचा फटका बसल्याने हा बंद पुकारला आहे. 26 ऑगस्टला मुसळधार पाऊस पडल्यानंतर अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. उधमपूर जिह्यातील थरादमध्ये रस्ता खचल्याने राजमार्गाला बंद करण्यात आले होते. एनएचएआयच्या प्रयत्नानंतरही एचएच-44 मार्ग अंशतः सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण राजमार्गावर विशेष करून रामबन आणि उधमपूर यादरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी आहे. देशात सफरचंदाचे 78 टक्के उत्पादन हे कश्मीरमधून होते.
वाहतूक कोंडीचा फटका
राजमार्गावर सफरचंद घेऊन जाणारे ट्रक वाहतूक कोंडीत अडकले आहेत. भूस्खलनामुळे केवळ एका बाजूची वाहतूक सुरू आहे. त्यातही प्रचंड चिखल आहे. वाहने तासन्तास एकाच ठिकाणी अडकून पडली आहेत. यामुळे पाच ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यात शेकडो ट्रक फसले आहेत. त्यामुळे बाजारातील व्यापाऱ्यांनी आणि फळ उत्पादकांनी सरकारविरोधात आंदोलन केले आहे. श्रीनगर ते जम्मूमध्ये अडकलेल्या सफरचंदाच्या ट्रकांना तत्काळ सोडावे, अशी मागणी फळ उत्पादकांनी केली आहे.
सफरचंद सडतील
जम्मूकडे जाणारे जे ट्रक आहेत, त्यांना जाऊ द्यावे. जर असे केले नाही, तर ट्रकमधील सफरचंद सडून जातील. यामुळे फळ उद्योगांना कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागेल. जम्मू-कश्मीर सफरचंद किसान संघाचे अध्यक्ष जहूर अहमद राठेर यांनी म्हटले की, लाखो कुटुंबाचा उदरनिर्वाह सफरचंदावर आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी तत्काळ यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी त्यांनी केली.