राहुल गांधी यांच्या दौऱ्याला सरकार का घाबरते? रावी नदीपार जाण्यास पोलिसांनी विरोध केल्यावर काँग्रेसचा संताप

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अमृतसर आणि गुरुदासपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांशी संवाद साधण्यासाठी पंजाबच्या दौऱ्यावर होते. त्यांनी अमृतसरमधील घोनेवाल गाव आणि गुरुदासपूरमधील गुरचक गावाला भेट दिली. पंजाब पोलिसांनी सोमवारी राहुल गांधी यांना गुरुदासपूर जिल्ह्यातील रावी नदीच्या पलीकडे असलेल्या पूरग्रस्त गावकऱ्यांना भेटू दिले नाही. पोलिसांनी राहुल गांधी यांना रावी नदीपलीकडे जाण्यापासून रोखले. याबाबत काँग्रेसकडून संताप व्यक्त करण्यात आला असून सरकार राहुल गांधी यांच्या दौऱ्याला का घाबरते? असा संतप्त सवालही केला आहे.

पोलिसांनी राहुल गांधींना गुरुदासपूरमधील रावी नदी पलीकडे असलेल्या तूर या सीमावर्ती गावाला भेट देण्यापासून रोखल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी रावी नदीपलीकडूल भाग हिंदुस्थानात नाही का? हिंदुस्थआनी भागातच राहुल गांधी यांना का भेटू दिले जात नाही? पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव हा दावा केला आहे. पोलीस राहुल गांधींच्या सुरक्षेसाठी सक्षम नाही का, असे सवाल केले आहेत.

याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात राहुल गांधी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत होते की त्यांना रावी नदी का ओलांडू दिले जात नाही? तुम्ही मला सांगत आहात की सुरक्षेच्या कारणास्तव तिथे जाण्यास रोखण्यात येत आहे. मात्र, हिंदुस्थानी भूभागावर तुम्ही मला सुरक्षित ठेवू शकत नाही का? असा सवाल त्यांनी केला. आम्ही तुमचे रक्षण करण्यास तयार आहोत. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव तिथे जाण्यापासून रोखण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

रावी नदीपलीकडील भागही हिंदुस्थानातच येतो. ती गावेदेखील हिंदुस्थानात आहेत, मग मला तिथे जाण्यापासून का रोखण्यात येत आहे? असा प्रश्न राज्य युनिट प्रमुख वारिंग आणि खासदार सुखजिंदर रंधावा यांच्यासोबत असलेल्या श्री. गांधी यांनी विचारला. आपल्या देशातील नागरिकच तिथे राहतात. राहुल गांधी त्यांना भेट देत नैसर्गिक आपत्तीनंतर ओढवलेल्या परिस्थितीची पाहणी करणार होते. तसेच नागरिकांची विचारपूस करणार होते. मात्र, त्यांना लोकांना भेटण्याची परवानगी दिली जात नाही हे दुर्दैवी आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि खासदार चरणजित सिंग चन्नी यांनी सांगितले. हे लज्जास्पद आणि असंवेदनशील असून सुरक्षेचे कारण देत क्षुल्लक सबबी सांगत आहे.