डुप्लांटिसची पुन्हा कमाल; 14 व्यांदा मोडला पोल वॉल्टचा विश्वविक्रम

तो आला… तो झेपावला… त्याने विश्वविक्रम मोडला… अन त्याने जगज्जेतेपदाचीही हॅटट्रिक केली. टोकियोच्या नॅशनल स्टेडियममध्ये सोमवारी रात्री पन्नास हजारांहून अधिक प्रेक्षकांसमोर स्वीडनचा आर्मंड डुप्लांटिस पुन्हा उंच झेपावला आणि पुन्हा इतिहास रचला. त्याने पोल वॉल्टमध्ये तब्बल 14व्यांदा विश्वविक्रम रचण्याचा पराक्रम करत नवा इतिहासही रचला. फेब्रुवारी 2022 मध्ये डुप्लांटिसचा विक्रम 6.17 मीटर इतका होता. त्यानंतर प्रत्येक झेपेसह तो उंचावत गेला आणि यावेळी त्याने 6.30 मीटरची अविश्वसनीय उंची गाठली. हा विक्रम फक्त 27 दिवसांपूर्वीच स्वतःच्या नावावर केलेल्या कामगिरीपेक्षा एक सेंटीमीटर अधिक होता.