
ड्रीम इलेव्हनने जर्सी पुरस्कर्त्याचा करार रद्द केल्यानंतर हिंदुस्थानची जर्सी कोरी झाली होती. सध्या सुरू असलेल्या आशिया कपमध्ये हिंदुस्थानी संघ पुरस्कर्त्याविना खेळत असताना पुढील दोन वर्षांसाठी नव्या जर्सी पुरस्कर्त्याचा बीसीसीआयचा शोध संपला आहे. ‘गो द डिस्टन्स’ म्हणजेच आव्हानांवर मात करून ध्येयापर्यंत पोहोचणाऱ्या अपोलो टायर्सचा विश्वास आणि टिकाऊपणाचा वेग हिंदुस्थानच्या जर्सीला लाभणार आहे. अपोलो टायर्स कंपनीने हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या जर्सीच्या पुरस्कर्त्याचे दोन वर्षांसाठी हक्क मिळविले आहेत.
केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग कायदा लागू केल्यानंतर ड्रीम इलेव्हनने जर्सी पुरस्कारातून माघार घेतली होती. त्यानंतर बीसीसीआयने आपल्या नव्या पुरस्कर्त्याचा शोध सुरू होता. या शर्यतीत अनेक दिग्गज कंपन्यांनी आपली ताकद लावली होती. मात्र टायर क्षेत्रातील अपोलो टायर्स या बहुराष्ट्रीय कंपनीने तीन वर्षांच्या करारासाठी तब्बल 579 कोटी रुपये मोजून केन्ना आणि जे. के. सिमेंटसारख्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. केन्नाने 544 कोटी, तर जे.के. सिमेंटने 477 कोटींची बोली लावली होती. टीम इंडियाची आधीची जर्सी स्पॉन्सर कंपनी असलेली ड्रीम इलेव्हन प्रत्येक सामन्यासाठी चार कोटी रुपये मोजत होती, मात्र आता अपोलो टायर्सकडून एका सामन्यासाठी 4.5 कोटी रुपये मिळणार आहे. हा करार 2027 पर्यंत चालणार असून, या काळात एकूण 130 सामने खेळले जातील. बीसीसीआयच्या एका अधिकाऱयाने मंगळवारी ही माहिती देताना म्हटले की, ‘अपोलो टायर्ससोबत करार निश्चित झाला आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल.
टीम इंडियाच्या जर्सी पुरस्कर्त्याच्या बोली प्रक्रियेत शंक एअर (उत्तर प्रदेश) व ओमेनफिट (दुबई) या कंपन्यांनीही सहभाग दर्शविला होता; परंतु अपोलो टायर्सने सर्वात मोठी व यशस्वी बोली लावत प्रायोजकत्व मिळवले. या करारामुळे बीसीसीआयला दरवर्षी मोठा महसूल मिळणार असून, हिंदुस्थानातील तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक लाभदायक करारांपैकी एक ठरणार आहे.
2 सप्टेंबरला काढले होते टेंडर
बीसीसीआयने 2 सप्टेंबर रोजी स्पॉन्सरशिपसाठी टेंडर (निविदा) काढले होते. त्यानुसार मद्य, तंबाखू, सट्टेबाजी, रिअल मनी गेमिंग (फॅन्टसी स्पोर्ट्स वगळता), क्रिप्टोकरन्सी, अश्लीलता तसेच सामाजिक नैतिकतेला बाधा आणणाऱया ब्रँड्सना या प्रक्रियेत सहभागी होऊ दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. बीसीसीआयने याबाबत अधिकृत माहिती ट्विटरवरून दिली होती. ड्रीम-11 ने 2023 मध्ये बीसीसीआयसोबत 358 कोटी रुपयांचा तीन वर्षांचा स्पॉन्सरशिप करार केला होता, परंतु अलीकडे ड्रीम-11 सह इतर रिअल मनी गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली गेल्याने हा करार रद्द करण्यात आला.