
दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ऐतिहासिक शिवाजी पार्क जिमखाना पुन्हा एकदा नव्या रंगात, नव्या ढंगात सुरू होतोय. 22 सप्टेंबरला घटस्थापनेच्या संध्याकाळी या नव्याने उभारलेल्या ‘हायटेक’ जिमखान्याच्या नूतन वास्तूचे उद्घाटन होणार असून, आधुनिक रूप आणि अत्याधुनिक सुविधा पाहून क्रिकेटपटू, क्रिकेटप्रेमी आणि सदस्यांना सुखद धक्का बसणार आहे.
1909 मध्ये ‘दादर हिंदू जिमखाना’ म्हणून सुरुवात झालेल्या या संस्थेने स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, असंख्य राजकीय घडामोडी व क्रिकेटसह अनेक खेळाडूंची जडणघडण जवळून पाहिली. विजय मांजरेकर, अजित वाडेकर, संदीप पाटील यांच्यासह क्रिकेटच्या पंढरीत वाढलेल्या या जिमखान्याने भारतरत्न सचिन तेंडुलकरलाही घडताना पाहिलेय.
शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या उंबरठय़ावर असलेल्या जिमखान्याने नव्या पिढीच्या अपेक्षांना साजेसा आधुनिक अवतार देण्यासाठी पुनर्बांधणी केली आहे. दीड वर्ष बंद असलेल्या या जिमखान्याचा चेहरामोहरा बदलून डिजिटल प्रवेश प्रणाली, अत्याधुनिक जिम, स्मार्ट सेफ्टी मॉनिटरिंग, नवे स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि आकर्षक इंटेरियर यामुळे 116 वर्षांचा जिमखाना तरुण आणि हायटेक झाला आहे. जिमखान्याच्या नव्या रुपाच्या उद्घाटनाला जिमखान्याच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेटरत्नांसह, आजी-माजी दिग्गज क्रिकेटपटू, राजकीय तसेच कला आणि साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांचीही पावले पडणार असल्याची माहिती जिमखान्याचे सरचिटणीस संजीव खानोलकर यांनी दिली.