दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी प्रवासी संघटना आक्रमक, 2 ऑक्टोबरला दादर स्थानकात लाक्षणिक उपोषण

कोरोना महामारीपासून बंद केलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने तातडीने ही गाडी पूर्ववत सुरू करावी, अन्यथा 2 ऑक्टोबरला मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात लाक्षणिक उपोषण करू, असा इशारा प्रवाशांतर्फे जल फाऊंडेशनचे नितीन जाधव आणि रेल्वे प्रवासी कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी दिला आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील वाढती प्रवासी संख्या विचारात घेऊन नवीन मुंबई-चिपळूण रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. मध्य रेल्वेने मुंबई-चिपळूणदरम्यान द्वितीय श्रेणी आरक्षित, एसी चेअर कार व सामान्य अनारक्षित डबे असणारी तसेच दादर, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे आदी स्थानकांवर थांबणारी नियमित गाडी सुरू करावी, अशी मागणी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.