प्रवासी सुरक्षा दुय्यम, राजकीय अजेंडा सुसाट! भुयारी मेट्रोच्या अंतिम टप्प्याच्या उद्घाटनाची घाई कामे अपूर्ण असताना पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पणाचा घाट

भुयारी मेट्रोचा वरळी ते कफ परेड यादरम्यानचा अंतिम टप्पा 30 सप्टेंबरला खुला केला जाणार आहे. अर्धवट कामे असताना केवळ राजकीय श्रेयासाठी हा टप्पा खुला केला जात असल्याने प्रवासी सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाचा दिखावा करण्यासाठी सुरक्षेकडे डोळेझाक केली जात असल्याने प्रवासी संतप्त प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

आरे जेव्हीएलआर ते वरळी आचार्य अत्रे चौक स्थानकापर्यंत सध्या भुयारी मेट्रोची सेवा सुरू आहे. या मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनातही घाई केली आणि पहिल्याच पावसाळ्यात वरळी मेट्रो स्थानकात पाणी साचले. त्यानंतर ठाकूरद्वार मेट्रो स्थानकाजवळ खड्डा पडला. रडतखडत सुरू राहिलेले मेट्रो स्थानकांचे काम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. उद्घाटनाला अवघे 14 दिवस बाकी असताना हुतात्मा चौक, ठाकूरद्वार, मुंबई सेंट्रल अशा अनेक स्थानकांच्या प्रवेशद्वारावरील कामे अर्धवट स्थितीत आहेत. दोन दिवसांपूर्वीच्या मुसळधार पावसात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात गळती झाली होती. त्यानंतरही उद्घाटनाची घाई कशासाठी, असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने अधिकाऱ्यांमध्येही संभ्रम

वरळी सायन्स म्युझिअम ते कफ परेड या 9.1 किमीच्या भुयारी मेट्रो मार्गाचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल, याबाबत मेट्रो प्रशासनाचे अधिकारीदेखील साशंक होते. याचदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबरचा मुहूर्त जाहीर केला. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनासाठी केलेल्या घोषणेने मेट्रो प्रशासनातील अधिकाऱ्यांची धांदल उडाली आहे.