
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा-देवरूख मार्गावर एक खळबळजनक घटना घडली आहे. अज्ञान व्यक्तींनी केतकर ज्वेलर्सच्या मालकाची गाडी अडवत त्याच्या अंगावर बुरखा टाकला आणि त्यांचे अपहरण केले. त्यांना मारहाण करण्यात आली व त्यांच्याकडून पंधरा लाखांचे दागिने आणि रोख वीस हजार रुपये लंपास केले. या घटनेमुळे सर्वच हादरून गेले असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय केतकर (63) हे काल (17 सप्टेंबर 2025) रात्री साखरपा येथून घरगुती कार्यक्रम आटपून देवरुख येथे जात होते. याच दरम्यान वांझोळे येथून एक किलोमीटर अंतरावर अज्ञात व्यक्तींनी गाडीची पाठलाग करून गाडीला गाडी घासली व वाटेतच गाडीची नुकसान भरपाई मागू लागले. मात्र, या गडबडीत केतकर हे गाडीतून उतरताच त्यांच्या अंगावर बुरखा टाकून त्यांना जबरदस्तीने हल्लेखोरांनी आपल्या गाडीत कोंबले आणि वाटुळ जवळ आणले व मोठ्या रकमेची मागणी केली. त्यांच्या जवळील सुमारे पंधरा लाखाचे दागिने रोख वीस हजार काढून घेतले व केतकर यांना तोंडाला व अन्य ठिकाणी मारहाण करून सोडून दिले.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह तपासाची चक्रे फिरवण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जातीने लक्ष घालून तपासाची चक्रे फिरवली असून अज्ञताचा शोध सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी कसून या घटनेची दखल घेतली आहे. केतकर यांच्या अपहरणामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबद्दल अज्ञात इसमांच्या विरुद्ध रजि.नं.104/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम गुन्हा 311,309 (4),310 (1),140 (2),127(2),115(2), 351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.