
>> संजय कऱ्हाडे
आजि सोनियाचा दिनु। बरसे अमृताचा घनु।।
विविध रूपांत हरीचं दर्शन झाल्यावर ज्ञानेश्वर माऊलीच्या तोंडून प्रकटलेला हा अभंग.
आजचा हिंदुस्थानचा ओमानसमोरचा सामना, सर्वात सोपा सामना, आटोपल्यावर क्रिकेटप्रेमी म्हणतील, आजि सोनियाचा दिनु। बरसे विक्रमांचा घनु।।
आजच्या हिंदुस्थानी संघात आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यांत शतक झळकवणारे फलंदाज आहेत. सूर्या (4), सॅमसन (3), अभिषेक आणि तिलक प्रत्येकी दोन आणि शुभमन एक. त्याचप्रमाणे दोन वेळा सामन्यात पाच बळी खिशात मिरवणारे गोलंदाज आहेत कुलदीप आणि वरुण.
आजच्या हिंदुस्थानकडे बाहुबली फलंदाज अन् जादूगार गोलंदाज वास्तव्यास आहेत. फलंदाजांच्या झंझावातासमोर ओमानचे अहमद, शाह, रामानंदी, श्रीवास्तव इ. पंपनी चिंटू-पिंटू गोलंदाज भासतायत. अन् बुमरा, पंडय़ा, कुलदीप, वरुण आणि अक्षरसाठी ओमानचे जतींदर, कलीम, मिर्झा, अली इ. पंपनी लेझीम फलंदाज वाटतायत! माझ्या मते, आजच्या सामन्याशेवटी आपण सकल अभंग रॉक चालीवर आरडण्याची दाटशी शक्यता आहे!
माझ्या साथी देशबांधवांनो, देशफलंदाजांनो, देशगोलंदाजांनो अन् देशक्षेत्ररक्षकांनो… संपूर्ण संघाचा मिळून असाही काही आगळा वेगळा विक्रम नोंदवण्याचीसुद्धा आपुल्याला संधी आहे. म्हणजे, आपल्या संघाच्या सर्वाधिक धावा किंवा सर्वात कमी धावांत प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा, किंवा कमीत कमी चेंडूंत विजय, सामन्यात सर्वाधिक हॅट-ट्रिका, षटकार, चौकार, षटकात सहा चौकार, षटकार, चार-पाच-सहा बळी इ. इ. तत्सम!
माझ्या साथी देशबांधवांनो, देशफलंदाजांनो, देशगोलंदाजांनो अन् देशक्षेत्ररक्षकांनो… आजच्या देशसामन्यासाठी खेळपट्टी, पाऊस, नो-पाऊस, थंडी-गर्मी, टॉस जिंकणं-हरणं इत्यादी गोष्टी गौण ठरलेल्या असाव्यात, सीमेपार टोलावल्यात जमा असाव्यात! आपुल्या बॅटीतून निघालेला चेंडू षटकार किंवा चौकारच असावा अन् हातून सुटलेला प्रत्येक चेंडू प्रतिस्पर्धी फलंदाजाला त्रिफळाचीत किंवा झेलचीत किंवा पायचीत किंवा स्वयंचीत किंवा धावचीत करणारा असावा!!
माझ्या साथी देशबांधवांनो, देशभगिनींनो… आजीच्या सामन्याचा आनंद आपण सर्वाधिक संख्येने लुटणंसुद्धा नवा विक्रम असू शकतो! कळावे, लोभ असावा, वृद्धिंगत व्हावा!