
ज्या स्टेडियमवर चार वर्षांपूर्वी हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्याच स्टेडियमवर नीरजला आपले जागतिक अॅथलेटिक्सचे जेतेपद राखण्यात अपयश आले. त्याने निराशाजनक कामगिरी करत जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत आठव्या क्रमांकावर घसरला. दुसरीकडे पदार्पण करणाऱया सचिन यादवने आपली कारकीर्द गाजवत चौथे स्थान मिळवत सर्वांना आश्चर्यचा धक्का दिला. त्रिनिदाद-टोबॅगोच्या केशर्न वॉलकॉटने हंगामातील सर्वोत्तम 88.16 मीटर फेक करत सोनेरी यश संपादले. ग्रेनाडाचा अॅण्डरसन पीटर्स रौप्य पदकाचा तर अमेरिकेचा कर्टिस थॉम्पसन कांस्य पदकाचा मानकरी ठरला.
नीरजची अपयशी झुंज
जेतेपद राखण्यासाठी उतरलेल्या चोप्राने पहिल्या प्रयत्नात 83.65 मीटरची फेक केली. तेव्हा तो पाचव्या स्थानावर होता. दुसऱया थ्रोमध्ये त्याने 84.03 मीटर गाठले, पण तिसऱया प्रयत्नात फाऊल झाला. चौथ्या फेकीत तो 82.86 मीटरवर थांबला. पुढे पाचव्या प्रयत्नात त्याने निर्णायक फेक करणे आवश्यक होते, मात्र तो फाऊल ठरला आणि त्याची मोहीम इथेच संपली. त्यामुळे सहाव्या आणि अंतिम फेरीसाठी तो पात्र ठरू शकला नाही. नीरजने 2021 मध्ये याच स्टेडियमवर ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे यंदाचे अपयश सर्वांना खटकत होते.
नीरजची सातत्यभंग
आपल्या सातत्यासाठी ओळखल्या जाणाऱया नीरज पाचही प्रयत्नांत 85 मीटरचाही टप्पाही ओलांडू शकला नाही. यापूर्वी त्याची सर्वात खराब कामगिरी 82.27 मीटरची होती. मे 2024 मध्ये दोहा डायमंड लीगमध्ये त्याने 90.23 मीटर भाला फेकून 90 मीटरचा अडथळा पार केला होता, मात्र त्यानंतर त्याच्या कामगिरीत घसरण दिसून आली आहे.
सचिन यादवचा पराक्रम
25 वर्षीय सचिन यादवने आज सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. नीरजचे अपयश सर्वांनाच टोचत असताना त्याने यशाला स्पर्श केल. पहिल्याच प्रयत्नात त्याने 86.27 मीटरची झेप घेतली. तीच कामगिरी त्याची कारकीर्दीतील सर्वोत्तम ठरली. यामुळे तो चौथ्या स्थानावर राहिला आणि त्याने काही आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडूंनाही मागे टाकले. पदार्पणातच अशी कामगिरी केल्यामुळे तो हिंदुस्थानचा नवा आशेचा किरण ठरला आहे.
अव्वल तीन भालाफेकपटू
सुवर्ण ः केशोर्न वालकॉट (त्रिनिदाद आणि टोबॅगो) 88.16 मीटर
रौप्य ः अॅण्डरसन पीटर्स (ग्रेनेडा) 87.38 मीटर
कांस्य ः कर्टिस थॉम्पसन (अमेरिका) 86.67 मीटर