
>> स्पायडरमॅन
आपल्या मनात अनेकदा चित्रविचित्र प्रश्न निर्माण होत असतात, काही अनोख्या शंका मनाला पडत असतात. अशा वेळी त्याचे उत्तर कसे आणि कुठे मिळवायचे? असा प्रश्न आपल्याला पडतो. मात्र इंटरनेटच्या आगमनानंतर कोणत्याही प्रश्नाचे उत्तर अगदी एका क्लिकवर मिळण्याची सोय झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा त्या त्या क्षेत्रातले तज्ञदेखील आश्चर्यकारक माहिती आपल्याला देत असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अनोख्या माहितीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि ती म्हणजे मिनरल वॉटरच्या बाटलीच्या झाकणाचा रंग हा कायम निळा का असतो?
आपल्यालादेखील अनेकदा हा प्रश्न पडलेला असतो की, कोणत्याही कंपनीची पाण्याची बाटली विकत घेतली तरी तिचे झाकण हे कायम निळ्या रंगाचेच का असते. क्षेत्रातले तज्ञ याच्या मागे मानसशास्त्र, विज्ञान आणि जाहिरातीची कला अशा अनेक गोष्टी असल्याचे स्पष्ट करतात. समुद्र असो किंवा आकाश असो, यांचे नाते पाण्यामुळे आपल्याशी अधिक जुळलेले आहे. या समुद्राचा, आकाशाचा रंग हा निळा असतो आणि हे दोघेही शुद्धता आणि ताजेपणाची जाणीव आपल्याला करून देत असतात. त्यामुळे निळा रंग दिसला की, अगदी चटकन ते पाणी ताजे आणि शुद्ध असल्याची भावना मनात निर्माण होण्यास मदत होते. निळा रंग हा विश्वास, ताजेपणा आणि शुद्धतेची भावना निर्माण करतो असेदेखील मत काही मानसतज्ञ व्यक्त करतात.
जाहिरातीचे उदाहरण देत तज्ञ सांगतात की, तुम्ही दुकानात गेलात आणि तिथल्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या अनेक बाटल्यांचे नावदेखील न वाचता तुम्ही लगेच ओळखता की, कोणती बाटली कोणत्या पेयाने भरलेली आहे. निळ्या रंगाचे झाकण म्हणजे मिनरल वॉटर, हिरवे म्हणजे सोडा आणि लाल म्हणजे कार्बोनेटेड शीतपेय. प्रत्येक रंग आपल्या जणू एक संदेश देत असतो. ही रंगाची ताकद आहे आणि आपल्या मनावर रंगाचा झालेला परिणाम आहे.