
मणिपूरमध्ये दोन वर्षांपासून सुरू असलेला रक्तरंजित हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. बिष्णुपूर जिल्हय़ात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी आसाम रायफल्सच्या ताफ्याला घेरले आणि अंदाधुंद गोळीबार केला. यात दोन जवान शहीद झाले असून, पाचजण जखमी आहेत. दरम्यान, इम्फाळ विमानतळापासून हे ठिकाण 8 किमीवर आहे. हल्ल्यानंतर मणिपूरमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
बिष्णूपूर जिल्हय़ातील नांबेल सबल लेइकै येथे शुक्रवारी सायंकाळी 5.50 च्या सुमारास भयंकर हल्ला झाला. आसाम रायफल्सच्या जवानांना घेऊन जाणारा ट्रक इंफाळहून बिष्णूपुरकडे निघाला होता. महामार्गावर दबा धरून हल्लेखोर लपून बसले होते. हल्लेखोरांनी अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यात दोन जवान शहीद झाले तर पाच जण जखमी आहेत. जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाईक सुभेदार श्याम गुरूंग आणि रायफलमॅन कश्यप हे शहीद जवानांचे नाव असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
सर्च ऑपरेशन सुरू
या हल्ल्याची जबाबदारी रात्री उशिरापर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने घेतली नव्हती. गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेले. दरम्यान, निमलष्करी दलाच्या जवानांनी नाकाबंदी केली असून, हल्लेखोरांचे युद्धपातळीवर सर्च ऑपरेशन सुरू आहे.
सकाळी रास्ता रोको झाला होता
पोलिसांनी सकाळी एका 45 वर्षीय नागरिकाला अटक केली होती. त्यावेळी हल्ल्याच्या ठिकाणापासून 20 कि.मी.वर मोठा रास्ता रोको झाला होता. त्यानंतर सायंकाळी आसाम रायफल्सच्या ट्रकवर गोळीबार झाला. या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे का याचा तपास आता सुरू आहे.
पंतप्रधान मोदींनी गेल्या आठवडय़ात दौरा केला होता
मे 2023 पासून मणिपुरात रक्तरंजित हिंसाचार सुरू असून, यात किमान 260 नागरिकांचा मृत्यू झाला. तब्बल 28 महिन्यांनंतर 13 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपुरात गेले होते. विकासासाठी शांतता गरजेची आहे, असे ते म्हणाले. मात्र, आज पुन्हा हिंसाचाराचा भडका उडाला आहे.