
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाचा मोठा दिखावा करून वाहतुकीला खुल्या केलेल्या शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूची वर्षभरातच चाळण झाली आहे. तब्बल 17 हजार 840 कोटी रुपये खर्चून बांधकाम केलेल्या या अटल सेतूची मोठमोठय़ा खड्डय़ांनी पुरती ‘वाट’ लावली आहे.
दक्षिण मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईला जोडणाऱया 22 किमीच्या अटल सेतूचे 12 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. उद्घाटनाचा मोठा गाजावाजा केला होता. श्रेय लाटण्यात पुढाकार घेतलेल्या सत्ताधाऱयांनी अटल सेतूचे बांधकाम आणि देखभालीमध्ये ‘गोलमाल’ केल्याचे उघडकीस आले आहे. सत्ताधारी आणि कंत्राटदारांच्या ‘महायुती’चा परिणाम अटल सेतूच्या बांधकाम दर्जावर दिसून आला आहे. मुंबईहून उलवेच्या दिशेने जाणाऱया तसेच नवी मुंबईतून मुंबईकडे येणाऱया अशा दोन्ही मार्गिकांवर वर्षभरातच खड्डेच खड्डे पडले. अनेक वाहनधारक खड्डय़ांची छायाचित्रे आणि खड्डेमय प्रवासाचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियात शेअर करीत आहेत. त्यामुळे सरकारच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. विकासाचा पोकळ दिखावा करण्याच्या प्रयत्नात सरकारने वाहतूक सुरक्षा धोक्यात टाकली आहे. अटल सेतूच्या निकृष्ट दर्जाच्या कामाला जबाबदार असलेल्या कंत्राटदार, अधिकारी तसेच संबंधित सत्ताधाऱयांवरही कडक कारवाई केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया अटल सेतूवरुन नियमित प्रवासी करणाऱया उलवे येथील श्रीधर म्हात्रे यांनी दिली.
कंत्राटदार देवू-टाटा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सला संबंधित भाग पाच दिवसांत दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. हे काम वेळेत पूर्ण झाले नाही तर कंत्राटदाराविरूद्ध अधिक कठोर कारवाई करू, असे एमएमआरडीएने म्हटले. प्राधिकरणाच्या दाव्यावर वाहनधारकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एमएमआरडीएचा दावा खोटा आहे. सेतूवरील रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून बुजवलेले खड्डेही लगेच उखडतील, अशी प्रतिक्रिया शिवडीतील श्रीकांत देसाई यांनी दिली आहे.
एमएमआरडीएने पावसावर फोडले खापर
अटल सेतूवरील खड्डय़ांमुळे एकनाथ शिंदे यांच्या ताब्यातील एमएमआरडीएच्या कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. मात्र स्वतःची नाचक्की लपवण्यासाठी एमएमआरडीएने खड्डय़ांचे खापर शहरात पडलेला पाऊस आणि सतत सुरू असलेल्या वाहतुकीवर फोडले.