ओह माय गॉड! ओमानने हिंदुस्थानचा दम काढला

300 धावांचे लक्ष्य गाठण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हिंदुस्थानी फलंदाजी रत्नांना ओमानने अवघ्या 188 धावांत रोखले. त्यानंतर ओमानने फलंदाजीत हिंदुस्थानी गोलंदाजांचा दम काढताना विजयाच्या दिशेने धावही घेतली होती. मात्र विजयापासून 40 धावा दूर असताना आमीर कलीमचा हार्दिक पंडय़ाने अफलातून झेल टिपला आणि सामन्याचा नूरच पालटला. अखेर हिंदुस्थानने नवख्या ओमानचा 21 धावांनी पराभव करत आशिया कप स्पर्धेच्या साखळीत विजयाची हॅटट्रिक साजरी केली. पण ओमानचा खेळ पाहून हिंदुस्थानी संघाला ओह… माय गॉड! म्हणण्याची वेळ आली होती. हिंदुस्थानप्रमाणे साखळीत श्रीलंकेनेही विजयी हॅटट्रिक केली.

हिंदुस्थानला 188 धावांवर रोखण्यात यश मिळवल्यानंतर ओमानच्या फलंदाजांनीही सर्वांची मनं जिंकली. कर्णधार जतींदर सिंग आणि आमीर कलीम यांनी 56 धावांची अत्यंत संथ सलामी दिली. ही भागी त्यानी 8.3 षटकांत साकारली. ओमानचा हा खेळ पाहून हिंदुस्थान सहज जिंकणार असेच भाकीत सारे वर्तवत होते. जतिंदर बाद झाल्यानंतर कलीम आणि हम्माद मिर्झाने जोरदार आणि यादगार फटकेबाजी करताना हिंदुस्थानच्या पायाखालची जमीनच सरकवली. त्यांनी 93 धावांची सणसणीत भागी रचली. 18 चेंडूंत 48 धावांची गरज असताना कलीमने हर्षित राणाला सलग दोन चौकार खेचले. तिसरा चेंडू वाया गेल्यानंतर चौथ्या चेंडूंला सीमारेषेबाहेर फेकण्याचा प्रयत्न केला, पण सीमारेषेपासून 2 मीटर दूर असताना पंडय़ाने हा झेल टिपत सामनाही टिपला. त्यानंतर ओमानने सामन्यावरची पकडही गमावली आणि हिंदुस्थानने त्यांना 167 धावांवर रोखत आपला विजयी प्रवास सुरूच ठेवला.

त्याआधी आज हिंदुस्थानने टॉस जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. हिंदुस्थान 300 धावांचे आव्हान उभारेल असे वाटत होते. पण अपयशी सलामीनंतर अभिषेक शर्मा तुटून पडला. त्याने 15 चेंडूंत 38 धावा ठोकल्या. तो बाद झाल्यावर संजू सॅमसननेही 56 धावा ठोकल्या. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या सर्वच फलंदाजांना फटकेबाजीची संधी दिली, पण कुणीही त्या संधीचे षटकार-चौकारात रूपांतर केले नाही. फक्त सूर्याच मैदानात उतरला नाही. अक्षर पटेल (26) आणि तिलक वर्मा (29) यांनीही उपयुक्त धावा करत संघाची धावसंख्या 188 पर्यंत ताणली.