
डेहराडून येथे पार पडलेल्या आशियाई ओपन शॉर्ट ट्रक स्पीड स्केटिंग ट्रॉफी स्पर्धेत गती, सहनशक्ती आणि रणनीतीचा थरार अनुभवायला मिळाला. महाराष्ट्राच्या 11 वर्षीय जिया शेट्टीने अफलातून स्केटिंग करताना दोन सुवर्णपदकांसह एक रौप्य आणि एक कांस्य जिंकत चौकार ठोकला.
या स्पर्धेत जपान, थायलंड, चिनीं तैपेई,व्हिएतनाम, सिंगापूर आणि फिलिपिन्ससह नऊ देशांतील खेळाडूंनी या ऑलिम्पिक हिवाळी क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता. हिंदुस्थानसाठी ही स्पर्धा ऐतिहासिक ठरली. जियाने 333 मीटर व 500 मीटर स्पर्धेत शर्यतीत सुवर्णपदकांना गवसणी घातली, तर 777 मीटर शर्यतीत तिने रौप्य कामगिरीही केली. तसेच मिश्र रिलेमध्ये तिने कांस्य पदकही जिंकले. या पदकांच्या चौकारासह जिया हिंदुस्थानची सर्वोच्च पदक विजेती खेळाडू ठरली. तिच्या या यशाने ती आशियातील सर्वाधिक प्रगतिकारक युवा खेळाडू ठरली. जियासह कमलाकर स्वर यानेही दोन सुवर्ण तर वर्धन लड्डाने दौन रौप्य तर अन्वयी देशपांडेने एक कांस्य पदक मिळवले.