टिळक पुलाच्या रुंदीकरणाची दीड वर्षापासून रखडपट्टी, एलफिन्स्टन पूल बंद झाल्याने दादरकरांची प्रचंड कोंडी!

एलफिन्स्टन पूल बंद केल्यामुळे दादरमधील वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. एलफिन्स्टन पुलाला पर्याय असलेल्या टिळक पुलाचे रुंदीकरण पूर्ण करण्याआधीच एलफिन्स्टन पुलाचे पाडकाम सुरू केले आहे. त्यामुळे दादर रेल्वे स्थानक परिसरापासून माटुंगा, माहीमपर्यंत वाहनांच्या मोठय़ा रांगा लागत आहेत. दसरा-दिवाळी सण जवळ आला असतानाच ही वाहतूक समस्या निर्माण झाल्याने व्यापारी वर्गही चिंतेत सापडला आहे.

टिळक पुलाच्या रुंदीकरणाचे काम मागील दीड वर्षापासून रेंगाळलेले आहे. हे काम आधी पूर्ण करणे आवश्यक होते. त्याआधीच एलफिन्स्टन पूल बंद केल्याने दादरचे स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱयांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गेले आठवडाभर सकाळी आणि सायंकाळी टिळक पुलावर प्रचंड वाहतूककाsंडी होत आहे. यात परळ परिसरातील रुग्णालयांच्या रुग्णवाहिका अडकत आहेत. अर्धा ते तासभर एकाच विभागात गाडय़ांचा खोळंबा होत आहे. एलफिन्स्टन पूल बंद करण्याआधी पर्यायी वाहतुकीच्या प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर दादर, प्रभादेवी, शिवाजी पार्क, शीतलादेवी मंदिर आणि माहीम परिसरातील रहिवाशांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. दादर परिसरातील वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी अतिरिक्त वाहतूक पोलीस तैनात करावे, तसेच रस्ते, फुटपाथवर अतिक्रमण करणारे फेरीवाले आणि मुख्य रस्त्यांवर बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या गाडय़ांवर कारवाई व्हावी याबाबत संबंधित अधिकाऱयांना आदेश देण्याची विनंती पोलीस आणि पालिका आयुक्तांना केली असल्याचे दादर व्यापारी संघाचे सचिव दीपक देवरुखकर यांनी सांगितले.

रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या सेवेबाबत चिंता

दादर परिसरातील वाहतूककाsंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत आहे. सुरळीत वाहतूक तसेच पादचाऱयांच्या सुरक्षेसाठी प्रभावी आपत्ती व्यवस्थापन, आपत्कालीन उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दलासारख्या आपत्कालीन सेवांबाबत गंभीर चिंतेची परिस्थिती आहे, याकडे पोलीस आणि पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.