
मानसिक आरोग्य कसे राखावे हे सांगत बदलत्या जीवनशैलीनुसार जडलेल्या मानसिक समस्यांचे निराकरण व त्यासाठीचे समुपदेशन करणारे हे सदर.
मेखलाताई आपल्या चिनूसाठी (दोघींची नावे बदलली आहेत) भयंकर काळजीत असायच्या. त्यांची चिनू म्हणजेच चिन्मयी अभ्यासात भयंकर हुशार होती. त्याचप्रमाणे इतर कौशल्यांतही पुढे होती. मेखलाताई सत्राला आल्यानंतर चिन्मयीची आणि त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी सांगत होत्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चिन्मयी आठवीत आल्यापासून तिचं अभ्यासातील लक्ष उडत चाललं होतं. घरीही ती अभ्यास करायची नाही. शाळेत कोणामध्येही आता मिसळत नव्हती. उलट तिच्या वर्गातील मुलामुलींना घाबरत होती.
घरीही तिची तीच परिस्थिती होती. चिन्मयीच्या या सतत माफी मागण्याच्या वृत्तीला आता मेखलाताई आणि त्यांचे यजमान कंटाळले होते. “हिचे बाबा तर आता सतत काळजीत असतात. चिनूला मोठा भाऊ आहे. तोही आता म्हणतो की, त्याच्याशी ही भांडत नाही. लगेच त्याचे पाय पकडते आणि माफी मागते.’’ चिन्मयीची अवस्था सांगताना मेखलाताईंच्या डोळ्यांत पाणी तरारलं.
चिन्मयी आईचं बोलणं ऐकत होती. तिच्याही चेहऱयावर अस्वस्थतेचे आणि चिंतेचे भाव होते. मेखलाताईंचं बोलणं संपल्यावर तिने बोलायला सुरुवात केली…“मॅम, मला मी आयुष्यात भरपूर मोठा गुन्हा केलेला आहे. त्यामुळे मी त्याचं प्रायश्चित्त घेते आहे.’’ तिचं बोलणं ऐकल्यावर मेखलाताई एकदम गांगरल्या. चिन्मयीने तिचा गुन्हा (?) सांगायला सुरुवात केली…“मी एकदा मोबाइल बघत होते. रील्स बघत असताना चुकून माझा हात एका रीलवर गेला आणि ती प्ले झाली. त्यात घाणेरडे प्रकार मी बघत राहिले. मी ते बंद करू शकले असते, पण मला त्या वेळी काय झालेलं ते माहीत नाही. मी बघत राहिले. नंतर मला भरपूर गिल्ट आलं. मी पटकन इकडे तिकडे बघितलं. कोणीही नव्हतं तिथे. मात्र आमचा देव मला पाहत होता.’’ चिन्मयी बोलता बोलता रडायला लागली.
‘‘देव पाहत होता म्हणजे?’’ असं तिला विचारलं असता ती पटकन उद्गारली, “मी जिथे बसले होते तिथे वरतीच आमचा देव्हारा आहे. त्यामुळे मी लगेच देवाची माफी मागितली आणि त्याला सांगितलं की, मला शिक्षा देऊ नकोस. मी आता यापुढे माझ्या प्रत्येक चुकीची लगेच माफी मागेन. कोणालाही दुखावणार नाही. म्हणून मी सगळ्यांचीच माफी मागत राहते. माझ्या मनातून ती घाणेरडी गोष्ट जातच नाही. सकाळ, संध्याकाळ जे पाहिलं होतं तेच आठवत राहतं आणि आठवल्यानंतर घाण वाटत राहते…स्वतची. मग मी पुन्हा देव्हाऱयाजवळ जाते आणि देवाची माफी मागत राहते.’’ चिन्मयीने केविलवाणेपणाने तिची अवस्था सांगितली. त्यानंतरही तिने दुसरा एका प्रसंग सांगितला, जेव्हा तिने पहिल्यांदा हस्तमैथुन (मास्टरबेट) केले होते. तेही सांगताना ती विलक्षण ओशाळवाणी झाली होती.
मंत्रचळाची म्हणजेच ओसीडीची लक्षणं चिन्मयीमध्ये दिसायला सुरुवात झाली होती. ती मनाच्या आहारी जात होती आणि वारंवार त्याच कृतीने (हात जोडणं आणि पाया पडणं) थकत होती. चिन्मयीचं लक्ष अभ्यासातून उडालं होतं.
चिन्मयीचं वयात येणं, लैंगिक इच्छा जागृत होणं, त्या विषयाचं कुतूहल आणि लैंगिक विषय आणि क्रियासंदर्भातली चुकीची माहिती आणि गैरसमज या सर्वांचा एकत्रित परिणाम मंत्रचळामध्ये झाला होता. तिचं समुपदेशन चालू असताना चिन्मयीने अजून एक घटना सांगितली. ती आणि तिची एक मैत्रीण जेव्हा तिच्या घरी खेळत होत्या तेव्हा चिन्मयीने तसले व्हिडीओ मैत्रिणीला दाखवले. नंतर त्या दोघींनी उत्सुकता म्हणून एकमेकींना किस करत तो अनुभव घेतला. नंतर चिन्मयीला अजूनच अपराधी वाटायला सुरुवात झाली.
“अगं काय हे? कधी केलास हा घाणेरडा प्रकार?’’ मेखलाताई तर प्रचंड चिडल्या तशी चिन्मयी रडायला लागली. सध्या दोघींनाही शांत करणं अत्यंत गरजेचं होतं. सोबत मेखलाताईंना धीर देणं प्राधान्याचं होतं. त्यामुळे त्यांना काही गोष्टी समजावल्या गेल्या. ज्यामध्ये;
– चिन्मयीचं पौगंडावस्थेतील वय.
– वयोपरत्वे तिच्यात होणारे शारीरिक आणि मानसिक बदल.
– तिला नसलेली लैंगिक विषयाची समज.
– चिन्मयी आणि मेखलाताईंना असलेले या विषयाबाबतचे गैरसमज आणि भय.
मेखलाताई सुरुवातीला हे सर्व ऐकताना प्रचंड अवघडल्या होत्या. लज्जेने आणि न्यून भावाने त्या ऐकत होत्या. त्यांच्या तसं वागण्याला आणि विचारांच्या मागे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी होती. त्यांचे वडील पौरोहित्य करणारे होते. त्यामुळे साहजिकच या ‘प्रतिबंधित’ विषयाचा उच्चार त्यांच्या घरातही वर्ज्य होता. मेखलाताईंच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होता. त्यामुळे त्यांनीही त्यांच्या मुलांना तसंच वळण लावलं होतं. म्हणूनच चिन्मयीचं हे सध्याचं वागणं त्यांना प्रचंड दुखावून गेलं होतं, पण समुपदेशनाने त्या बऱयाच निवळल्या. त्यांना त्यांच्या कर्मठ विचारांतून बाहेर यावंच लागणार होतं. कारण शेवटी त्यांच्या लाडक्या चिनूच्या आयुष्याचा प्रश्न होता जी ‘न घडलेल्या पापाची शिक्षा स्वतला करून घेत होती.’ चूक आणि पाप या दोन शब्दांमध्ये गल्लत करून घेत होती. तिलाही सावरणं, तिच्यावर योग्य ते मानसोपचार आणि समुपदेशन लवकरात लवकर सुरू करणंही गरजेचं होतं.
सध्या चिन्मयी मानसोपचार आणि समुपदेशन घेते आहे आणि स्वतच्या नकारात्मक विचारांवर काम करते आहे. तिला वाटणाऱया लैंगिक उत्सुकता आणि समजुती यावरही शास्त्राrय दृष्टिकोनातून विचार करण्यास आणि समजून घेण्यास शिकते आहे. त्याचबरोबर स्वतसाठी आवश्यक अशी काही सावध पाऊले (गुड टच आणि बॅड टच) ओळखण्यास शिकते आहे. अभ्यासात तिचं लक्ष लागायला सुरुवात झाली आहेच. शिवाय चिन्मयीचं हात जोडणंही कमी झालंय.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)