लोक संस्कृती -जन प्रबोधनाची मशाल

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

सर्व संप्रदायातील संतांनी आपला समाज प्रबोधनाचा विचार प्रवाह ‘भजन’ या लोककलेतून प्रवाहित केला. प्रचंड लोकाश्रय लाभलेल्या या लोककलेचा प्रभाव जनसामान्यांच्या मनात आजही आहे. लोकरंजन व लोकशिक्षण देणाऱया भजन या लोककलेचा व्यासंगी व साक्षेपी आढावा घेणारे हे सदर.

संत वाङ्मयावर आधारित असणाऱया भजनी मंडळांनी समाज प्रबोधनाचे व लोकशिक्षणाचे कार्य तर केलेले आहेच, त्याशिवाय लोकांचे रंजन करण्यासाठीही त्यांनी आपली वाणी आणि देह झिजविला आहे. खरे तर भजनी मंडळे या विषयाकडे आजवर सर्वसामान्य माणसांपासून ते विद्वानांपर्यंत केवळ भक्तिरसाच्या दृष्टीने पाहिले गेले आहे. भजनी मंडळांचा आधार व साचा हा संत वाङ्मयावरच आधारलेला आहे. त्यात भक्तिरस ओथंबलेला आहे. किंबहुना भक्ती हाच याचा गाभा आहे. मात्र त्यामध्ये लोकप्रबोधन, लोक जागृती आणि लोकचळवळ करणे हा उद्देशही अंतर्भूत आहे आणि तो महत्त्वाचा आहे. अर्थात त्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत भजन कलेला मानाचे स्थान प्राप्त झालेले दिसून येते. श्री. म. माटे म्हणतात त्याप्रमाणे ‘पारमार्थिक लोकशाही’ची स्थापना या भजनी मंडळातूनच झाल्याचे प्रकर्षाने दिसून येते

समाजाला चार नीतीच्या गोष्टी सांगता सांगता त्यांचे रंजन करणे व लोकशिक्षण देणे याबाबतीत भजनी मंडळाचा गेल्या शेकडो वर्षांपासून फार मोठा वाटा राहिला आहे. अशा परिस्थितीत भजनी मंडळाचा पुरोगामी आणि प्रबोधनाच्या दृष्टीने अभ्यास होणे अत्यंत गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर कर्मकांडे आणि अंधश्रद्धा, श्रेष्ठ कनिष्ठाची खोटी भेदनीती, दांभिकता आणि फसवणूक यांसारख्या माणुसकीशी फारकत घेणाऱया विचारावर व रूढी-परंपरांवर कठोर प्रहार करीत मानवतावाद निर्माण करण्याचे कार्य या भजनी मंडळांनी केले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम या काळातील चारशे वर्षांमध्ये कोणत्याही चमत्काराशिवाय संत वाङ्मयाने महाराष्ट्राला झोपेतून हलवून जागे केले. त्यामध्ये या विविध संप्रदायातील भजनी मंडळांचा फार मोठय़ा प्रमाणात वाटा आहे. सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक चळवळींशी यांचा निगडित असलेला दृष्टिकोन पाहता गेली काही शतके भजन केलेने उत्स्फूर्त आणि सहजपणे स्थानिक जीवनाचे प्रतिनिधित्व समर्थपणे केल्याचे दिसून येते. म्हणूनच लोकरंजनातून लोकशिक्षण व ज्ञान प्रसार करणारी भजनी मंडळे व त्यांचे ‘प्रसार माध्यम व जन संज्ञापन’ या दृष्टीने योगदान महत्त्वाचे आहे. भारतीय संस्कृतीला हजारो वर्षांची दीर्घ आणि वैभवशाली परंपरा आहे. या सांस्कृतिक परंपरेत एक सातत्य आहे, जे टिकविण्याचे कार्य भारतीय कलेने केले आहे. हा सांस्कृतिक वारसा लोककला, संगीत, नृत्य, नाटय़, साहित्य चित्रकला, शिल्पकला यांच्याद्वारे वर्षानुवर्षे जतन केला गेला आहे. भजन, भारुड, गोंधळ यांसारख्या लोककला प्रकारांतून गेली अनेक वर्षे लोकरंजन व लोकशिक्षण दिले जात आहे. समाजाची सांस्कृतिक व सामाजिक जडणघडण करण्याचे काम या कलांनी केले आहे. अर्थात जन संज्ञापन व प्रसार माध्यम म्हणून भजनी मंडळांनी मोठे कार्य केले आहे हे स्पष्टपणे दिसून येते आहे. यामधून होणारा संवाद हा परिणामकारक झाला आहे.

समूह जीवनात भाषेला फार महत्त्व आहे. जन संज्ञापनासाठीही भाषा महत्त्वाची असते. ती सार्वजनिक, सर्वमान्य किंवा सामायिक असावी लागते. जनसमूहापर्यंत ती संदेशाद्वारे पोहोचविण्यासाठी माध्यम म्हणून ती वापरली जाते. ‘भजन’ या माध्यमातूनसुद्धा तत्कालीन जनजीवनाशी समरस अशा भाषेचा वापर करण्यात आला आहे. संत वाङ्मयावर आधारित भजन कलेने तत्कालीन परिस्थितीशी समरस होत सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात काळानुरूप परिवर्तन घडविण्यास मोठा हातभार लावला आहे. हे या लोककलेचे महत्त्वाचे योगदान यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.

(लेखक मानसशास्त्राचे व लोककलेचे अभ्यासक आहेत.)

[email protected]