
वारंवार होणाऱया तांत्रिक बिघाडामुळे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेल्या जुन्या मोनोरेलची जागा आता नवी मोनो घेणार आहे. अत्याधुनिक सीबीटीसी सिग्नल प्रणालीवर आधारित नव्या मोनोच्या चाचण्या एमएमआरडीएने सुरू केल्या आहेत. शनिवारी नव्या मोनोची पहिली चाचणी झाली. झुकणाऱ्या आणि कलणाऱया जुन्या मोनोच्या थरारक आठवणी मागे सारत ही नवी मोनो झोकात धावली. लवकरच ही मोनो मुंबईकरांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे.
दहा वर्षांपूर्वी अडीच हजार कोटी रुपये खर्च करून मोनोरेलचा प्रकल्प उभारण्यात आला होता, मात्र तुरळक प्रवासी संख्या आणि गाडय़ांमधील तांत्रिक बिघाडांमुळे हा प्रकल्प एमएमआरडीएसाठी पांढरा हत्ती ठरला होता. सोयीपेक्षा गैरसोयीमुळेच मोनो जास्त ओळखली जाऊ लागली. मागच्या महिनाभरात मोनो तीनदा बंद पडली. कधी तांत्रिक बिघाड, कधी वीज पुरवठा खंडित तर कधी ओव्हरलोडमुळे प्रवाशांवर जीवघेणा प्रसंग ओढवला.
चहूकडून टीकेची झोड उठल्यानंतर अखेर एमएमआरडीएला जाग आली आणि मोनोची सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता जुन्या मोनोच्या जागी हिंदुस्थानी बनावटीच्या दहा नव्या मोनो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या गाडय़ांमध्ये उत्तम दर्जाच्या सुविधा आहेत. सध्या या मोनोची ट्रायल रन सुरू असून ट्रेन ऑपरेटरला प्रशिक्षण दिले जात आहे. या ट्रायल रनचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.