
आमदारांना विकासकामांसाठी दोन कोटी रुपये मिळतात, पण मी आमदार नसताना मला 20 कोटी रुपये मिळाले, असा दावा शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी केला.
सदा सरवणकर यांच्या वक्तव्याचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात सरवणकर हे काही लोकांशी एका बांधकामासंदर्भात संवाद साधताना दिसत आहेत. या बांधकामासाठी परवानगी नव्हती, पण आपण ती मिळवली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आपल्याला लाभले आहे, त्यामुळेच आमदार नसतानाही 20 कोटी रुपये मिळाले, असे सरवणकर त्यात सांगताना दिसतात.
सरवणकर म्हणजे माहीमला लागलेला डाग – महेश सावंत
सदा सरवणकर यांच्या वक्तव्याबद्दल माहीम विधानसभेचे शिवसेना आमदार महेश सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे. सरवणकर म्हणजे माहीम मतदारसंघाला लागलेला डाग आहे, शिवसेनेने त्यांना पोसले, त्यांना शिवसेनेने गडगंज श्रीमंत केले पण तोच पैसा आज ते शिवसेनेच्या विरोधात वापरत आहेत, असे महेश सावंत म्हणाले. माजी आमदार किती खालच्या पातळीवर गेलाय त्याचे सरवणकर हे उत्तम उदाहरण आहे. उद्या जिल्हा नियोजनच्या बैठकीत आपण सरवणकर यांची क्लिप पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवणार आहोत, असा इशाराही महेश सावंत यांनी दिला.