टेरेस, कंपाऊंड वॉलवर होर्डिंग उभारण्यास मनाई; घाटकोपर बेकायदा होर्डिंग प्रकरणाच्या चौकशी अहवालात शिफारस, 40 बाय 40 फूट आकारालाच मान्यता, एक महिन्यात कार्यवाहीचे निर्देश

मुंबईत यापुढे टेरेस आणि कंपाऊंड वॉलवर होर्डिंग उभारण्यास निर्बंध येणार आहेत. त्याचप्रमाणे होर्डिंगचा आकारही 40 बाय 40 फूट इतका मर्यादित ठेवावा लागणार आहे. घाटकोपर येथे बेकायदा होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी स्थापन न्यायमूर्ती दिलीप भोसले समितीच्या अहवालात यासंदर्भात शिफारस करण्यात आली आहे.

हा अहवाल शिफारशींसह स्वीकारण्यास तसेच समितीचे निष्कर्ष व सुचविलेल्या उपाययोजनांवर करावयाच्या अंलबजावणीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. संबंधित विभागांनी एक महिन्याच्या मुदतीत या अहवालावर कार्यवाही करण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत.

होर्डिंगची नियमित तपासणी करावी, अनधिकृत फलकांवरील कारवाईसाठी नोडल यंत्रणा नियुक्त करावी याबरोबरच स्थानसापेक्ष धोके, वाहतूक सुरक्षितता, पादचाऱ्यांची, विशेषतः दिव्यांगाची सुरक्षितता व सोय, रचना, परिसर व पर्यावरण या अनुषंगानेही सविस्तर शिफारशी समितीने केल्या आहेत.

घाटकोपर येथे 13 मे 2024 रोजी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 नागरिकांचा मृत्यू आणि 80 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या दुर्घटनेचा चौकशी अहवाल यापूर्वीच न्यायमूर्ती भोसले समितीने सादर केला होता. त्यातील उपाययोजनांवर पडताळणी करण्यासाठी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने आज मंत्रिमंडळासमोर विविध विभागांनी करावयाच्या अंमलबजावणीचा कृती अहवाल सादर केला.