मतदार यादीतील नावं वगळण्यासाठी निवडणूक आयोगाने आणले ‘ई-साइन’ फिचर, राहुल गांधींच्या आरोपांनंतर आयोगाचा निर्णय

निवडणूक आयोगाने आपल्या पोर्टल आणि अ‍ॅपवर नवे ‘ई-साइन’ फिचर सुरू केले आहे. याअंतर्गत मतदार म्हणून नोंदणी करणे, नाव वगळणे किंवा दुरुस्ती करण्यासाठी अर्ज करणाऱ्यांना त्यांच्या आधाराशी जोडलेल्या फोन नंबरचा वापर करून स्वतःची ओळख पटवावी लागणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन कशा प्रकारे मतदारांची नावं वगळली गेली हे सांगितले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी अर्जदार आपला फोन नंबर विद्यमान मतदार फोटो ओळखपत्र (ईपीआयसी) क्रमांकाशी जोडून निवडणूक आयोगाच्या अ‍ॅप किंवा पोर्टलवर फॉर्म भरू शकत होते, पण त्यामधील माहिती खरी आहे की नाही, ती माहिती त्यांचीच आहे का नाही याची पडताळणी होत नव्हती.

ईसीआयनेट पोर्टलवर फॉर्म 6 (नवीन मतदार नोंदणीसाठी), फॉर्म 7 (सद्याच्या मतदार यादीत नाव समाविष्ट किंवा वगळण्यासाठी आक्षेप घेण्यासाठी) किंवा फॉर्म 8 (नोंदीतील दुरुस्तीसाठी) भरताना अर्जदारांना आता ‘ई-साइन’ पूर्ण करणे बंधनकारक असेल. याचा युजर ज्यासाठी अर्ज करत आहे त्या मतदार ओळखपत्रावरील नाव हे आधारवरील नावाशी जुळले पाहिजे आणि वापरलेला मोबाईल क्रमांक हा आधारशी जोडलेला असावा अशी प्रक्रिया आता नव्याने आणण्यात आली आहे.

आक्षेप नोंदविण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म 7 मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या फॉर्ममध्ये ज्या व्यक्तीचे नाव वगळायचे आहे किंवा ज्यावर आक्षेप घ्यायचा आहे त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागते.

अर्जदाराने फॉर्म भरल्यानंतर त्याला सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) या संस्थेच्या ई-साइन पोर्टलवर आणलं जातं. हे पोर्टल केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत आहे. सी-डॅकच्या पोर्टलवर अर्जदाराने आपला आधार क्रमांक भरावा लागतो आणि त्यानंतर एक ‘आधार ओटीपी’ तयार होतो, जो त्या आधारशी जोडलेल्या फोन नंबरवर पाठवला जातो.

यानंतर अर्जदाराने आधार-आधारित प्रमाणीकरणासाठी संमती द्यावी लागते आणि सत्यापन प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अर्जदाराला पुन्हा ईसीआयनेट पोर्टलवर पाठवले जाते आणि तिथे फॉर्म अंतिम स्वरूपात सादर करता येतो. ‘ई-साइन’ सुविधा सुरू झाल्यामुळे आलंदमध्ये जे घडले तसे प्रकार होण्याची शक्यता आता खूपच कमी झाली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.