
कायमच आर्थिक तोट्यात असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमल) कंपनीला पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संचालक मंडळ पुन्हा सक्रिय झाले आहे. आता ‘पीएमपीएल’च्या व्यावसायिक विकासासाठी आणि बस मार्गांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी देशपातळीवरील अनुभवी सल्लागार नेमण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीत झाला.
‘पीएमपीएमएल’च्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी पार पडली. महापालिका आयुक्त व पीएमपीएमएल संचालक मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष नवलकिशोर राम
यांनी ही माहिती दिली.
पीएमपीएमएलची पुणे महापालि का, पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या हद्दीप्रमाणेच पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीत (पीएमआरडीए) बससेवा सुरू आहे. या बस मार्गांपैकी अनेक मार्ग हे संचलनातील तूट असूनही सुरू ठेवले जात आहेत. तसेच सध्या शहरात सुरू असलेल्या अनेक मार्गांची पाहणी करून त्याची फेररचना करावी लागणार आहे. बस मार्गांचे सुसूत्रीकरण करण्याची गरज असून, त्याची सुरुवात महापालिकांच्या हद्दीतून करून नंतर ग्रामीण भागात विस्तार करण्यावर सर्वांचे एकमत झाले. सुरुवातीला एका डेपोचा पायलट प्रोजेक्ट म्हणून विकास करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील सल्लागार नेमून त्याच्याकडून अहवाल तयार करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चार मार्गावर आठ डबलडेकर बसेस
लवकरच ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात आठ डबलडेकर बसेस येणार आहेत. या बसेससाठी अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या व वायर नसतील असे चार मार्ग निवडले जात आहेत. प्रायोगिक स्वरूपात या चार मार्गावर आठ डबलडेकर बसेस धावणार असून, ट्रायल यशस्वी झाल्यानंतरच त्या नियमित सेवेत आणल्या जातील, असेही नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले.
१ हजार सीएनजी बसेस खरेदीवर चर्चा
पीएमपीएमएल आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे अत्यावश्यक आहे. यासाठी एक हजार नवीन सीएनजी बसेस खरेदीचा प्रस्ताव अजेंड्यावर होता. यात टाटा आणि अशोक लेलॅण्डच्या बसेसबाबत चर्चा झाली. तसेच पीएमपीएमएलच्या डेपोंसह इतर जागांचा व्यावसायिक विकास करून उत्पन्नवाढ साधता येणार आहे.