अभिनेता संजय दत्त उज्जैनमध्ये बाबा महाकालच्या दरबारात, भस्म आरतीत तल्लीन

मध्य प्रदेशातील उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मंदिर भस्म आरतीसाठी प्रसिद्ध आहे. पहाटे चारच्या ब्रम्ह मुहुर्तावर होणाऱ्या भस्म आरतीची परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे. भस्म आरतीत सहभागी होता यावं यासाठी अनेक शिवभक्त प्रयत्न करत असतात. बॉलिवूड कलाकरही यात मागे नाहीत. बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त यानेही उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घेतले.

संजय दत्त गुरूवारी 25 सप्टेंबर रोजी उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शनासाठी गेला. यावेळी तो भस्म आरतीत सहभागी झाला आणि शिवशंकरांचे आशीर्वाद घेतले. मंदिराच्या नंदी हॉलमध्ये बसून संजय दत्त हा संपूर्ण भस्म आरतीत सहभागी झाला.

अभिनेता संजय दत्त मंदिरात जातानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये संजय दत्त मंदिरातील आध्यात्मिक वातावरणाचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. यावेळी त्याने भगवा कुर्ता परिधान केला होता. तसेच कपाळावर भगवा टिळा लावलेला दिसत आहे.

भस्म आरतीमध्ये सहभागी झाल्यानंतर संजय दत्तने आपली भावना व्यक्त केली. “बाबा महाकाल यांनी मला त्यांच्या दर्शनासाठी बोलावले, हे माझे भाग्य आहे. मी अनेक वर्षांपासून येथे येण्याचा प्रयत्न करत होतो. आज येथे येऊन भस्म आरती पाहण्याची संधी मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे. इथे आल्यावर मला थेट दैवी ऊर्जा जाणवली. बाबा महाकाल यांचे आशीर्वाद सर्वांवर राहावेत अशी माझी इच्छा आहे.”, असे संजय दत्त म्हणाले.