
सूर्याच्या सेनेने Asia Cup 2025 मध्ये धुडगूस घालत पाचही सामन्यांमध्ये विरुद्ध संघांना चितपट केलं आहे. पाकिस्तानला दोन वेळा लोळवत हिंदुस्थानने अंतिम फेरीत राजेशाही धडक मारली. परंतु, सुपर4 च्या सामन्यात पाकिस्तानचे खेळाडू साहिबजादा फरहान आणि हॅरिस रौफ यांनी आपल्या अकलेचे तारे तोडत हिंदुस्थानला डिवचण्याचा प्रयत्न केला, जो आता त्यांच्याच अंगलट आला आहे. BCCI ने या दोघांचीही ICC कडे तक्रार केली होती. ICC ने आता कारवाई करत हॅरिस रौफला ICC आचारसंहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे.
BCCI ने तक्रार दाखल केल्यानंतर ICC ने याची दखल घेतली आणि हॅरिस रौफला सामना शुल्काच्या 30 टक्के दंड ठोठावला आहे. अभिषेक शर्माने चोपून काढल्यानंतर हॅरिस रौफ अभिषेकला भिडला होता. तसेच सीमारेषवर क्षेत्ररक्षण करताना त्याने चुकीचे वर्तन केले होते. याचीच दखल घेत ICC ने त्याच्यावर कारवाई केली आहे. त्याचबरोबर सुपर 4 च्या सामन्यात अर्धशतक झळकावत साहिबजादा फरहानने बॅटच्या मदतीने फायरिंग करतानाची अॅक्शन केली होती. त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी, अशी मागणी BCCI ने केली होती. मात्र, त्याला ICC ने फक्त समज आणि इशारा देऊन सोडून दिलं आहे.
Haris Rauf fined 30 per cent of his match fees for abusive behaviour and aggressive gesture during Indo-Pak Asia Cup game: Tournament Sources.
— Press Trust of India (@PTI_News) September 26, 2025
हिंदुस्थान आणि पाकिस्तान पुन्हा एकदा रविवारी (28 सप्टेंबर 2025) अंतिम फेरीत एकमेकांना भिडणार आहेत. आशिया चषक पहिल्यांदा 1987 मध्ये खेळला गेला होता. त्यानंतर आतापर्यंत आशिया कपचे 17 हंगाम खेळले गेले. 1984 ते 2025 मध्ये 41 वर्षांचे अंतर असून आशियातील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पहिल्यांदा हिंदुस्थान-पाकिस्तान विजेतेपदासाठी झुंजणार आहेत.