आजपासून कोकण, विदर्भ, मराठवाडय़ात अतिमुसळधार, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा; मुंबईलाही ‘ऑरेंज अलर्ट’

राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असताना 27 सप्टेंबरपासून 29 सप्टेंबरपर्यंत कोकण किनारपट्टीसह, विदर्भ आणि मराठवाडय़ासह मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यावेळी जोरदार वारेही वाहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा खबरदारीचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे  राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मात्र यामुळे आधीच मराठवाडा आणि विदर्भात अस्मानी संकट आणखी गडद होण्याची भीती आहे. 27 सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता अधिक असण्याचा अंदाज आहे. हवामानतज्ञांच्या मते, मराठवाडय़ात रात्रीच्या वेळी होणाऱ्या पावसामागे ‘डाऊनरफ्ट’ ही महत्त्वाची प्रक्रिया कारणीभूत आहे. दिवसा हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे ढगांमध्ये पाण्याची धारणक्षमता वाढते. रात्री तापमान कमी होताच हे ढग अचानकपणे कोसळतात आणि मुसळधार पाऊस पडतो. 12 सप्टेंबरपासून अशाच पद्धतीने विदर्भ, मराठवाडय़ात अनेक ठिकाणी रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे. याशिवाय हिमालय प्रदेशातील तापमानातील बदलामुळे ढगांची घनता वाढत असून त्याचा परिणाम म्हणून मराठवाडय़ासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा तडाखा बसत आहे.

बीड जिह्यासह अनेक भागांत ‘यलो अलर्ट’

अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. बीड जिह्यासह अनेक भागांत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.  आपत्ती व्यवस्थापन विभागाने महत्त्वाची कागदपत्रे, औषधे, अन्नसाठा आणि पिण्याचे पाणी आदी सुविधा तैनात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

बंगालच्या उपसागरात अतिवृष्टीची स्थिती

बंगालच्या उपसागरातील वायव्य आणि लगतच्या मध्य भागावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा शुक्रवार, 26 सप्टेंबर सकाळी 11.30 वाजेपर्यंत कायम होता. हा पट्टा पश्चिमेकडे सरकत पुढील 12 तासांत वायव्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात दाब कमी होऊन मुसळधार पावसाच्या स्थितीत जाण्याची शक्यता आहे. यानंतर हा कमी दाबाचा पट्टा दक्षिण ओडिशा-उत्तर आंध्र प्रदेश किनाऱ्यावरून पुढे सरकणार आहे. यामुळे राज्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.