
हिंदुस्थान ‘अ’ संघाने लखनऊच्या मैदानावर खऱ्या अर्थाने ऐतिहासिक कामगिरी बजावली. 412 धावांचे डोंगराएवढं आव्हान 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पार पाडले आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धची दोन अनधिकृत कसोटी सामन्यांची मालिका 1-0 अशी खिशातही घातली. या चमत्कारिक विजयामागे हुकमाचा एक्का ठरलेला के. एल. राहुल शेवटपर्यंत ठामपणे उभा राहिला. तापामुळे गुरुवारी 74 धावांवर निवृत्त झालेल्या राहुलने पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचे धाडस केले आणि दोन दमदार भागी रचत हिंदुस्थानला दुहेरी विजय मिळवून दिला.
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियाच्या ‘अ’ संघातील हा सामना अत्यंत चुरशीचा ठरला. दोन्ही संघांना विजयाची समान संधी असल्यामुळे हिंदुस्थान ‘अ’ साठी विजयाचा प्रवास सोपा नव्हता. ऑस्ट्रेलिया ‘अ’ ने पहिल्या डावात कर्णधार मॅकस्विनीच्या 74, जॅक एडवर्ड्सच्या 88 आणि मर्फीच्या 76 धावांच्या खेळीच्या जोरावर 420 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात हिंदुस्थानचा पहिला डाव साई सुदर्शनच्या 75 धावांशिवाय फक्त 194 वर गडगडला. सामन्याचा रंग बदलला तो दुसऱ्या डावात-गुरनूर ब्रार, मानव सुथार, सिरा आणि यश ठाकूर यांनी धारदार गोलंदाजी करीत ऑस्ट्रेलियाचा डाव 185 धावांत गुंडाळला. डावखुरा फिरकीपटू मानव सुथारने 8 विकेट घेत विजयाचा पाया रचला.
तरीही विजयासाठी 412 धावांचे प्रचंड आव्हान उभे होते. एन. जगदीशन आणि राहुल यांनी 85 धावांची सलामी देत धडाकेबाज सुरुवात केली. त्यानंतर राहुल आणि साई सुदर्शन (100) यांनी चौफेर फटकेबाजी करीत हिंदुस्थानचा विजयाचा मार्ग सुकर केला. ध्रुव जुरेलने 66 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकारांसह झळकावलेल्या 56 धावांनी संघाला विजयसमीप आणले. अखेरीस राहुलने नितीश कुमार रेड्डीसह 31 धावांची नाबाद भागीदारी करत संघाच्या विजयावर कळस चढवला.
राहुलचा लबाणा
गुरुवारी अर्धशतक झळकावूनही तापामुळे राहुल मैदानाबाहेर गेला होता. त्याची तब्येत चिंतेत टाकणारी ठरली, पण त्याने लवृत्ती दाखवत आज पुन्हा मैदानात पाऊल ठेवले आणि 210 चेंडूंत 16 चौकार व 4 षटकारांसह 176 धावांची जबरदस्त खेळी करून विजय हिंदुस्थानच्या झोळीत टाकला. त्याच्या झुंजार खेळाने केवळ सामनाच वाचवला नाही, तर वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी संघाचा आत्मविश्वासही उंचावला. गुरुवारी मैदानाबाहेर गेलेला राहुल मानव सुथार बाद झाल्यानंतर पुन्हा मैदानात उतरला आणि त्याने आधी सुदर्शनसह 78 धावांची तर जुरेलसह 115 धावांची भागी रचत संघाचा विजय निश्चित केला. राहुलने टी-20 स्टाईलमध्ये फटकेबाजी करताना 16 चौकार आणि 4 षटकार खेचले. तसेच जुरेलनेही शतकी भागी रचताना आपल्या 56 धावांच्या नाबाद खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार लगावत आपल्या नेतृत्वाची जबाबदारीही चोख बजावली.