डोंबिवली स्थानकात अरुंद फलाट, बंद एस्कलेटरमुळे अपघाताचा धोका; शिवसेनेचे स्टेशन मास्तरांना निवेदन

डोंबिवली रेल्वे स्थानकावरील कल्याण व मुंबई दिशेकडील पाच क्रमांकाचा प्लॅटफॉर्म अरुंद आहे. शिवाय सरकते जिनेही नादुरुस्त आहेत. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. अपघाताचा धोकाही वाढला आहे. गर्दीच्या वेळी तर चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होते. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी रेल्वेने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहे. यासंदर्भात आज पक्षाच्या शिष्टमंडळाने डोंबिवली रेल्वे स्थानक प्रमुख प्रवीणकुमार वर्मा यांची भेट घेऊन निवेदन दिले.

प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर जागा अत्यंत अरुंद असल्यामुळे महिलांना, लहान मुलांना व वृद्धांना सकाळच्या गर्दीत उभे राहणे आणि खचाखच भरलेल्या लोकलमध्ये चढणे-उतरणे कठीण जाते. अरुंद जागेमुळे धक्काबुक्की, चेंगराचेंगरी होऊन अपघात होत आहेत. त्यामुळे तातडीने उपाययोजना करून दोन्ही दिशेला प्रवाशांसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिष्टमंडळाने दिला. यावेळी जिल्हा संघटक तात्या माने, महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर, उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, ओंकार नाटेकर, शहर महिला संघटक अक्षरा पटेल, संजय पाटील, प्रमोद कांबळे, स्वप्नील पाटील, आकाश पाटील, अर्जुन माने, वैभव कारखानीस, प्राजक्ता देशपांडे, विलास नायर, भावेश पवार, गोविंद कुलकर्णी, अभय दिघे, मंगेश सरमळकर, विमल बुरशे, चित्रा जवेरी, छाया सावंत, माधुरी घोसाळकर, शेखर चव्हाण, अनिल मुथा, नारायण गायकवाड आदी उपस्थित होते.

उ‌द्घाटनासाठी कोणाची वाट पाहताय?
फलाट क्रमांक 3, 4 व 5 वर नव्याने बसवण्यात आलेले एस्कलेटर अद्याप सुरू केलेले नाही. रोज प्रवाशांची तोबा गर्दी असताना एस्कलेटर का सुरू केले जात नाही, असा सवाल यावेळी तात्या माने आणि वैशाली दरेकर यांनी केला. काम पूर्ण झाल्यानंतरही प्रवाशांना वेठीस का धरले जाते. उद्घाटनासाठी कोणाची वाट पाहत आहात का, असा बोचरा सवालही त्यांनी केला.