
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासात 48 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. अनेक महसूल मंडळामध्ये 5 पेक्षा जास्त वेळेस अतिवृष्टी झाल्याने मोठा हाहाकार उडाला आहे. साडेआठ लाख हेक्टर खरीप हंगामापैकी 7 लाख हेक्टर शेती नेस्तनाबूत झाली आहे. सोयाबीन, कापूस, बाजरी, कडधान्य हाती काहीही राहिले नाही. पशुधनाचीही प्रचंड हानी झाली आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासामध्ये पावसाने हाहाकार उडवून दिला. तब्बल 48 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यातील असंख्य महसूल मंडळ असे आहेत ज्यात 5 पेक्षा जास्त वेळेस अतिवृष्टी झाली आहे. साडेआठ लाख हेक्टरवरील खरीप पिकांपैकी नुकसानीचा आकडा 7 लाख हेक्टरवर जावून पोहचला आहे. रात्रभर नद्या रौद्ररूप धारण करून वाहत होत्या. पहाटेही नद्यांना महापूर कायम होता.
रविवारी सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी नद्यांचा प्रवाह मात्र नियंत्रणात येत नसल्याचे दिसून येत आहे. पुराचे पाणी शेतात घुसल्याने सर्वाधिक फटका बसला आहे. केवळ खरीप हंगामच वाहून गेला नाही तर जन्मभराची भाकरी देणारी काळी आईच वाहून गेली आहे. चार इंच मातीचा थर पावसात वाहून गेला तर त्या शेतीमध्ये दोन-चार वर्ष काही पिकत नाही. येथे तर दहा दहा फुट शेती खरडून गेली आहे. हे पिढ्यानपिढ्याचे नुकसान पावसामुळे झाले आहे.
गेल्या चोवीस तासात बीड जिल्ह्यामध्ये सरासरी 64 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे तर आतापर्यंत 136 मि.मी.पाऊस झाला आहे. रविवारी सकाळपर्यंत 48 महसूलात अतिवृष्टी झाली. यात राजुरी 73.3, पेंडगाव 80, मांजरसुंबा 74.8, चौसाळा 70.8, नेकनूर 68.3, लिंबागणेश 85.3, नाळवंडी 71.5, कुर्ला 72.8, पाली 82.5, बीड 78.8, पिंपळनेर 68.3, चर्हाटा 73.3, पारगाव सिरस 73.3, पाटोदा 70.8, दासखेड 81.8, थेरला 82, अंमळनेर 91.5, दौलावडगाव 129, टाकळसिंग 99, आष्टी 75, धानोरा 113.8, कडा 75, धामणगाव 95.5, पिंपळा 102, डोईठाण 91.5, आष्टा हरिनारायण 75, दादेगाव 113.8, गेवराई 69, जातेगाव 86.3, पाचेगाव 65.5, सिरसदेवी 71.3, धोंडराई 68.8, तलवाडा 66.3, उमापूर 75, चकलांबा 75, हनुमंत मंडळ 103.8, विडा 69.8, नांदूरघाट 74.8, होळ 72.8, धारूर 68.8, वडवणी 67.3, कवडगाव 67.3, शिरूर 81, रायमोहा 68, तिंतरवणी 75, ब्र.येळंब 81, गोमळवाडा 91.5, खालापुरी 71.3 एवढा पाऊस झाला आहे.