
चर्चगेट रेल्वे स्थानकातील मोटरमनचे उपाहारगृह लवकरच विविध सुविधांसह सुरू केले जाणार आहे. हे उपाहारगृह चार महिन्यांपासून बंद होते. परिणामी, पश्चिम रेल्वेच्या जवळपास 1100 मोटरमनची मोठी गैरसोय होत होती. याबाबत दै.’सामना’ने वृत्त प्रसिद्ध करताच खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने कार्यवाहीला गती दिली. त्यानुसार मोटरमनचा नाश्ता, जेवणाचा प्रश्न सुटणार आहे.
चर्चगेट रेल्वे स्थानकातील विश्रांतीगृह 5 जून रोजी केक शॉपला लागलेल्या आगीच्या घटनेपासून बंद होते. विश्रांतीगृह कम उपाहारगृह सुरू करण्याबाबत मोटरमन संघटनांनी पत्रव्यवहार केला. त्यानंतरही प्रशासन ढिम्म राहिले होते. अखेर दै. ‘सामना’ने आवाज उठवला आणि उपाहारगृह नूतनीकरणाला गती देण्यात आली. सध्या हे काम अंतिम टप्प्यात असून उपाहारगृह लवकरच सुरू केले जाणार आहे.
चार महिने उपाहारगृह बंद असताना मोटरमनना अनेकदा सकाळची ड्युटी उपाशीपोटी करावी लागली. परिणामी, अनेकांना विविध व्याधींचा त्रास सहन करावा लागला. लवकरच उपाहारगृह सुरू होऊन मोटरमनची गैरसोय दूर होणार असल्याने मोटरमन-कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.