
मुंबईतील वाढत्या वाहतूककोंडीवर मात करून वेगवान प्रवासासाठी कुलाब्यापासून थेट ठाणे-कल्याणपर्यंत मेट्रो रेल्वेचे जाळे विणण्यात येत आहे. या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी राज्याच्या नगरविकास विभागाने मुंबई मेट्रो रेल्वे व एमएमआरडीएला तब्बल 461 कोटी 80 लाख रुपयांचा निधी एका फटक्यात वितरित केला आहे. राज्य सरकारने या दोन्ही संस्थांना बिनव्याजी दुय्यम कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील वाहतूक समस्येवर मार्ग काढण्यासाठी मुंबई मेट्रो रेल्वेची योजना आखण्यात आली. जून 2006 मध्ये या प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ झाला. पहिली मेट्रो लाइन 8 जून 2014 रोजी वर्सोवा ते घाटकोपर सुरू झाली.
कर्जाची जबाबदारी शासन घेणार
मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जाची जबाबदारी स्वीकारण्यास व आवश्यक करार करण्यासही राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या प्रकल्पांना मंजूर केलेल्या मर्यादेत बहुपक्षीय वित्तीय संस्था व अन्य संस्थामार्फत सुलभ व्याज दराचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कर्जाच्या अनुषंगाने शासन हमी देण्यास सरकारने मान्यता दिली आहे.
मुंबईतील मेट्रो रेल्वेचे प्रकल्प
- मुंबई मेट्रो लाइन तीन कुलाबा वांद्रे सिप्झ- 80 कोटी 80 लाख रुपये
- मुंबई मेट्रो लाइन पाच, ठाणे-कल्याण भिवंडी- 32 कोटी 50 लाख रुपये
- मुंबई मेट्रो लाइन सहा, स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी- विक्रोळी, 50 कोटी रुपये
- मुंबई मेट्रो मार्ग 2 अ, दहिसर- डी. एन. नगर, 37 कोटी 50 लाख रुपये
- मुंबई मेट्रो मार्ग बारा, कल्याण तळोजा, 10 कोटी रुपये
- मुंबई मेट्रो दोन ब, डी.एन. नगर मंडाळे-दहिसर चारकोप-वांद्रे-मानखुर्द – 73 कोटी 50 लाख रुपये
- मुंबई मेट्रो दहा गायमुख शिवाजी चौक (मीरा रोड)-10 कोटी रुपये
- मुंबई मेट्रो चार वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली आणि मुंबई मेट्रो चार अ- कासारवडवली-गायमुख- 100 कोटी रुपये
- मुंबई मेट्रो सात अंधेरी पूर्व- दहिसर पूर्व- 37 कोटी 50 लाख रुपये
- मुंबई मेट्रो 9- दहिसर ते मीरा-भाईंदर मार्ग आणि मार्ग अ अंधेरी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 30 कोटी रुपये