लडाखी मुलं दहशतवादी आहेत का? गोळ्या चालवायचे आदेश कुणी दिले? सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली यांचा सवाल

‘लेहमधील तरुण शांततेच्या मार्गानेच आंदोलन करणार होते, मात्र सीआरपीएफच्या जवानांनी अश्रुधुर आणि गोळीबार केल्यामुळे परिस्थिती चिघळली. सीआरपीएफला गोळ्या चालवण्याचे आदेश नेमके कुणी दिले? आंदोलन करणारी मुले दहशतवादी होती का,’ असा रोकडा सवाल सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केला. ‘लेहमधील हिंसाचाराशी सोनम यांचा संबंध नाही. त्यांना अडकवण्याचा पद्धतशीर कट शिजला आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.

लेहमधील हिंसाचाराला जबाबदार धरून वांगचुक यांना केंद्र सरकारने रासुकाखाली अटक केली आहे. अटकेनंतर त्यांना पाकिस्तानचे हस्तक ठरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनी लॉण्डरिंगच्या गुह्यात अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्या कटकारस्थानांची पोलखोल गीतांजली यांनी ‘बीबीसी’शी बोलताना केली. मनी लॉण्डरिंगची केस होऊच शकत नाही!

‘सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या रेड टाकून गोंधळ उडवून देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, मात्र यातून त्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. मी अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये काम केले आहे. मी फायनान्समध्ये एमबीए आहे. आमचे 99.99 टक्के व्यवहार ऑनलाइन होतात. त्यामुळे आमच्या विरोधात मनी लॉण्डरिंगची केस होऊच शकत नाही. आमच्या संस्थेकडून आम्ही एक पैसाही घेत नाही. उलट वर्षाला 50 लाख ते 1 कोटी आम्हीच देतो, असे गीतांजली म्हणाल्या.

सोनमने पाकिस्तानात मोदींचे कौतुक केले होते!

पाकिस्तान दौऱ्यावरून सोनम यांना आयएसआयचे एजंट ठरवण्याचा प्रयत्न करणे अत्यंत मूर्खपणाचे आहे. हा दौरा संयुक्त राष्ट्रांच्या हवामानविषयक परिषदेचा भाग होता. त्यात मीही होते आणि इतर आठ संघटनांचे प्रतिनिधी होते. त्या व्यासपीठावरून सोनम यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले होते. या सगळ्याचे व्हिडीओ आमच्याकडे आहेत. त्यामुळे सरकार कोणालाही मूर्ख बनवू शकत नाही, मात्र सोनम यांची प्रतिमा मलिन करण्याचे व त्यांना अडकवण्याचे आधीच ठरले आहे, असा आरोप गीतांजली यांनी केला.

‘ते’ आश्वासन भाजपच्या जाहीरनाम्यात

‘सोनम हे लडाखला सहाव्या परिशिष्टात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी लढत आहेत. भाजपने निवडणूक जाहीरनाम्यातच तसे आश्वासन दिले होते. शांततेच्या मार्गाने ते सरकारचे याकडे लक्ष वेधत आहेत. केंद्रशासित प्रदेशाची अनेक वर्षांपासूनची मागणी भाजपने पूर्ण केली, मात्र ती अर्धीच पूर्ण केली. कायदेमंडळाशिवाय केंद्रशासित प्रदेशाला अर्थच नाही, अशी खंत गीतांजली यांनी व्यक्त केली.

‘सोनमला अटक होऊन 24 तास झाले, मात्र आम्हाला एकही फोन आला नाही. ते जोधपूरला गेले आहेत की नाही हेही माहीत नाही. आमचे फोनही उचलले जात नाहीत.