नेपाळनंतर पेरूमध्ये Gen-Z निदर्शने, भ्रष्टाचारविरोधात रस्त्यावर उतरली तरुणाई

नेपाळमधील आंदोलनांनंतर आता दक्षिण अमेरिकेतील पेरूमध्येही Gen-Z तरुणांनी रस्त्यांवर उतरून भ्रष्टाचार आणि पेन्शन सुधारणांविरोधात तीव्र निदर्शने केली आहेत. या आंदोलनदरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीमार केला. यानंतर तरुणांनी दगडफेक केली. २० सप्टेंबरपासून हे आंदोलन सुरु झाले आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात तरुण सहभागी झाले असून हे पेरूतील राजकीय अस्थिरतेचे लक्षण मानले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेन्शन प्रणालीत बदल झाल्यानंतर हे निदर्शने सुरू झाले आहेत. नवीन नियमानुसार पेरूमधील १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाने कोणत्याही कंपनीत सामील होणे बंधनकारक आहे. याशिवाय देशातील वाढत्या भ्रष्टाचारामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. ज्याविरोधात आता लोक रस्त्यावर उतरले आहेत.

या निदर्शनांचा पेरूच्या महत्त्वाच्या खाण उद्योगावरही परिणाम होत आहे. पेरू हा जगातील तिसरा सर्वात मोठा तांबे, सोने आणि चांदीचा प्रमुख उत्पादक देश आहे. हडबे मिनरल्सने मंगळवारी जाहीर केले की, त्यांनी निदर्शनांमुळे त्यांच्या कॉन्स्टँसिया खाण तात्पुरती बंद केली आहे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणखी ताण येऊ शकतो.

दरम्यान, याआधी नेपाळ Gen-Z आंदोलन पाहायला मिळालं होतं. हे आंदोलन इतकं तीव्र होतं की, तेथील पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला होता. आता तशीच परिस्थिति पेरूमध्येही पाहायला मिळत आहे.