पंढरपुरात पुराचा धोका वाढला, उजनी, वीरमधून 1 लाख 33 हजारांचा विसर्ग

उजनी धरणातून 1 लाख 25 हजार, तर वीरमधून 8 हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत करण्यात येत आहे. यामुळे पंढरपूर येथे इशारा पातळीवरून वाहणारी चंद्रभागा नदी उद्या (दि. 29) धोकापातळी ओलांडण्याची भीती आहे. यामुळे चंद्रभागेचा पंढरपूर येथील पुराचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या व्यासनारायण झोपडपट्टीतील नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या हालचाली प्रशासनाने सोमवारी रात्री सुरू केल्या आहेत.

नीरा व भीमा खोऱयात पुन्हा दमदार पाऊस सुरू झाला आहे. यामुळे धरणात येणारी आवक वाढली आहे. त्यामुळे रविवारी (दि. 28) कमी केलेला विसर्ग आज वाढवण्यात आला आहे. सोमवारी दुपारी उजनी धरणातून भीमा नदीत 1 लाख 25 हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. तर, वीर धरणातून करण्यात येणारा 8 हजारांचा विसर्ग कायम आहे. सध्या दोन्ही धरणांतून 1 लाख 34 हजार 400 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी पंढरपूर येथे मंगळवारी सकाळी दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, पंढरपूर येथे सध्या 80 हजार क्युसेकचा विसर्ग वाहत आहे.

पंढरपूर तालुक्यातून ओढे, नाले भरून वाहत आहेत. हे पाणीदेखील भीमा नदीत मिसळत आहे. त्यामुळे धरणातून येणारा विसर्ग आणि स्थानिक ओढे, नाल्यांचा विसर्ग पाहाता उद्या (दि. 29) भीमा नदीतून 1 लाख 50 हजार क्युसेक पाणी वाहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पंढरपूर येथील संभाव्य पुराचा धोका वाढला आहे.

पंढरपूर येथे भीमा (चंद्रभागा) इशारा पातळीवरून वाहणारी धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरे पुराच्या पाण्यात अर्धी बुडाली आहेत. महाद्वार घाटाच्या पायऱयांवर पाणी आहे. मंदिरांना पाण्याचा वेढा कायम आहे. कोल्हापूर पद्धतीचे बंधारेही पाण्याखाली आहेत. तेथील वाहतूक गेल्या दोन आठवडय़ांपासून बंदच आहे. नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

उजनी व वीर धरणांतून पाण्याचा विसर्ग मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहे. हे पाणी पंढरपूर येथे मंगळवारी सकाळी दाखल होईल. संभाव्य पुराचा धोका ओळखून व्यासनारायण झोपडपट्टीतील कुटुंबांचे रातोरात स्थलांतर करण्यात येणार आहे. नदीकाठच्या नागरिकांनीदेखील दक्षता घ्यावी.
-सचिन इथापे, प्रांताधिकारी, पंढरपूर