रस्त्यावर काढलेल्या ‘रांगोळी’वरून अहिल्यानगरात तणाव; लाठीचार्ज

अहिल्यानगर शहरातील बारातोटी कारंजा परिसरात मोहम्मद पैगंबर यांच्या नावाची रांगोळी रस्त्यावर काढल्याचा प्रकार समोर येताच मुस्लिम समाज संतप्त झाल्याने तणाव निर्माण झाला. मुस्लिम समाजाने रस्त्यावर उतरून कोठला परिसरात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. आंदोलनात पोलिसांनी यशस्वी मध्यस्थी केली; पण मुस्लिम समाजाने आपल्या मागण्या लावून धरल्या होत्या. संतप्त तरुणांनी रस्त्यावरील काही वाहनांच्या काचा फोडल्या, काही वाहनांचे नुकसान केले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. दरम्यान, शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुपारनंतर शहरात अनेक ठिकाणी दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी 20 ते 22 जणांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले आहेत. शेख अल्तमश सलीम जरीवाला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरती संग्राम रासकर व संग्राम आसाराम रासकर (रा. बारातोटी, कारंजा) यांच्यावर गुन्हा दाखल केला, तर एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

आज सकाळी माळीवाडा परिसरात रांगोळी काढण्यावरून वाद निर्माण झाला होता. कोतवाली पोलिसांनी तत्काळ धाव घेत एका व्यक्तीला ताब्यात घेतले. मात्र, घटनास्थळी मोठय़ा संख्येने मुस्लिम समाज जमा झाला. त्यांनी आक्रमक भूमिका घेत गुन्हा दाखल केल्याशिवाय येथून हलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर मुस्लिम समाजाने कोठला व आयुर्वेद कॉर्नर येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले. संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून, आता आंदोलन करण्याची गरज नाही, असे पोलीस सांगत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनीही आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, आंदोलनामुळे अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे गोंधळ आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगविले. आता शहरातील तणाव शांत झाला असून, पोलिसांनी संबंधित युवकाला व आंदोलन करणाऱयांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी 25 ते 30 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, संभाजी गायकवाड, आनंद कोकरे यांच्यासह पोलीस पथकाने परिस्थिती नियंत्रणात आणली.

मास्टरमाइंडचा शोध घ्या शिवसेनेची मागणी

शहरामध्ये सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करणाऱया घटना घडत आहेत. काही समाजकंटक सोशल मीडियाचा गैरवापर करून तेढ निर्माण करणाऱया पोस्ट व्हायरल करतात. काही लोक आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी चिथावणीखोर वक्तव्य करतात. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने प्रेरित काही लोक दंगल घडवण्यासाठी षडयंत्र रचत आहेत की काय, असा दाट संशय यातून येत आहे. या घटनेच्या मास्टरमाइंडचा शोध घेऊन पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार जगताप यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

रांगोळी प्रकरणावरून शहरात सकाळी वातावरण तापले होते. यामध्ये कोतवाली पोलीस स्टेशनसमोर लावण्यात आलेला वादग्रस्त फलक आणि हिंदू तरुणाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आमदार संग्राम जगताप यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात 2 तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. कोतवालीचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी कारवाईचे आश्वासन दिले.