इंडोनेशियात इस्लामिक शाळेची इमारत कोसळली, एकाचा मृत्यू तर 65 विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकलेत

इंडोनेशियामध्ये एका इस्लामिक शाळेत मोठी दुर्घटना घडली आहे. शाळेची बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे तर 65 मुलं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना जावा येथील शाळेत घडली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथक शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

इंडोनेशिया न्यूज एजन्सी अंताराच्या बातमीनुसार, सर्व विद्यार्थी दुपारच्या नमाज पठणासाठी एका वर्गात जमले असताना ही दुर्घटना घडली. अचानक इमारत कोसळली आणि मुले बचावासाठी ओरडू लागली.  पूर्व जावा पोलिस प्रवक्ते ज्यूल्स अब्राहम अबास्ट यांनी एएएफएला दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर आमचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि 79 हून अधिक विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. रुग्णालयातील अहवालात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी देण्यात आली आहे. या दुर्घटनेवेळी नेमके किती विद्यार्थी होते त्याचा शोध घेतला जात आहे. तसेच ढिगाऱ्याखाली नेमके किती विद्यार्थी अडकले आहेत हे निश्चित करण्यासाठी आम्ही शाळा प्रशासन आणि संबंधित लोकांशी संपर्क साधत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शाळेचे मुख्याध्यापक अब्दुस सलाम मुजीब यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या शाळेची तीन मजली इमारत होती, ती वाढवून चौथा मजल्याचे काम सुरु होते. त्या दरम्यान ही दुर्घटना घडली.