बीडमध्ये अनाथांनी पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात

बीड जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीने लाखो संसार पाण्यात बुडाले. मुसळधार पावसाने स्वप्नांचा चुराडा केला. अशा विदारक परिस्थितीतही जगण्याची उमेद निर्माण करणारा क्षण बीडमध्ये पाहाण्यास मिळाला. जिव्हाळा केंद्रातील अनाथ असलेल्या 50 जणांनी आपल्याकडे भीक मागून काम करून गोळा झालेल्या रक्कमेतून एका उद्धवस्त झालेल्या कुटुंबाचा संसार उभा करून दिला. संसारोपयोगी साहित्यापासून मुलांच्या वह्या, पुस्तकापर्यंत सर्व काही त्या कुटुंबाकडे आज सुपुर्द केले. ही घटना नक्कीच दिलासादायक आहे.

सिंदफणेला महापूर आला. नदीने पात्र बदलले. सिंदफणा नदी रौद्ररूप धारण करत होती. प्रचंड नुकसान सिंदफणेच्या पाण्याने झाले. हिंगणी हवेलीमध्ये असाच थरारक प्रसंग त्या पूरपरिस्थितीत घडला. दिड एकर शेती असणारे सरवदे कुटुंब शेतामध्ये होते. पूराच्या पाण्याने वेढा दिला होता. शेती घरामध्ये पुराचे पाणी घुसले. तब्बल 36 तासानंतर सरवदे कुटुंबातील नऊ जणांना रेसक्यू ऑपरेशन करून वाचवण्यात आले. ते वाचले पण त्यांचा सगळा संसार नेस्तनाबूत झाला. घरात काहीही राहिले नाही. भांडेकुंडे, अंथरूण पांघरूणासह मुलांचे दफ्तरे आणि वह्या पुस्तकेही पाण्यात वाहून गेले. हे कुटुंब निर्वासित झाले. या दुर्देवी घटनेची माहिती मिळाल्यानंतर बीड शहरातील 50 अनाथांनी ज्या जिव्हाळा केंद्रामध्ये राहतात त्यांनी दातृत्व दाखवले. कुणी भीक मागून, कुणी घरकाम करून तर या जिव्हाळ केंद्रात ज्यांचे वाढदिवस असतात ते दहा पाच रूपये जिव्हाळा केंद्रातील अनाथांना आणून देतात. या अनाथांनी काही रक्कम गोळा केली आणि त्या रक्कमेतून उद्धवस्त झालेल्या सरवदे कुटुंबाला मदतीचा हात दिला. सर्व संसारच त्यांनी जणू उभा करून दिला. हा क्षण नक्कीच माणुसकीला दिलासा देणारा होता.