
कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बस कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला. एव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक रमेश कटीगंडला व मोरया ट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ राम सूर्यवंशी यांना दोषमुक्त केले.
कुर्ला येथे 9 डिसेंबर रोजी बेस्टच्या एसी बसने वाहनास व तेथील काही नागरिकांना धडक दिली. या अपघातात 9 जणांचा बळी गेला, तर 42 जण जखमी झाले. या प्रकरणी बस चालक संजय मोरे याच्या विरोधात बेदरकार वाहन चालवल्या प्रकरणी व निष्पाप लोकांचा बळी घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर रमेश कटीगंडला व राम सूर्यवंशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या दोघांनी दोषमुक्ततेसाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. अॅड. सुवर्णा आव्हाड व अॅड. शरण्य वस्त यांनी अर्जदाराच्या वतीने बाजू मांडताना आरोपपत्रात अर्जदारांविरुद्ध एकही पुरावा नसल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत अर्जदाराना दोषमुक्त केले.

























































