
पत्नीच्या डोळय़ांत चटणी टाकून तिच्यावर कोयत्याने वार करून तिचा खून करणाऱया पतीला पोलिसांनी गजाआड केले आहे. भादोले-कोरेगाव रस्त्यावर भादोले गावच्या हद्दीत रात्री घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
रोहिणी प्रशांत पाटील (वय 28, रा. भादोले, ता. हातकणंगले) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. पती प्रशांत पाटील याला वडगाव पोलिसांनी अटक केली आहे.
पत्नी रोहिणी हिचे वडील दवाखान्यात उपचार घेत असल्यामुळे रोहिणी आणि प्रशांत हे आठवडाभरापासून सांगली जिह्यातील ढवळी येथे तिच्या माहेरी ये-जा करीत होते. आज सायंकाळी ढवळी येथून दुचाकीवरून पती-पत्नी भादोलेला येत होते. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव-भादोले रस्त्यावर भादोले येथील झुंजीनाना मळ्याजवळ दोघे आले असता, पती प्रशांत याने पत्नी रोहिणी हिच्या डोळ्यांत चटणी टाकून तिच्या गळा आणि चेहऱयावर कोयत्याने वार केले. यामध्ये गंभीर जखमी रोहिणीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पती प्रशांत भादोले येथे आला. शेजारच्या लोकांना पत्नीचा खून केल्याचे सांगून, ‘मुलींकडे लक्ष ठेवा, मी आता पाच-सहा महिने येणार नाही,’ असे सांगून फरार झाला. या घटनेने गावात खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संशयित आरोपी प्रशांत पाटील याच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना करून रात्री उशिरा त्यास ताब्यात घेण्यात आले. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचेही पथक दाखल झाले होते. खुनाचे नेमके कारण काय, याबाबत भादोले गावात रात्री उशिरापर्यंत उलट-सुलट चर्चा सुरू होती.