ओंकार मित्र मंडळाचा माणुसकीचा ओलावा; 26 हजार रुपयांचा गव्हाचे पीठ पूरग्रस्तांना सुपूर्द

गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाडा, विदर्भ, नाशिक व सोलापूर जिल्ह्यांतील शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे. शेती, घरे आणि सार्वजनिक मालमत्तेवर आलेल्या आपत्तींमुळे लोक उध्वस्त झाले असून, या संकटाच्या काळात चिपळूण शहरातून मदतीचा ओलावा घेऊन हात पुढे सरसावले जात आहेत.

चिपळूण शहरातील कावीळतळी येथील ‘ओंकार मित्र मंडळा’ने ‘माणुसकीच्या भावनेतून’ पूरग्रस्तांसाठी 26 हजार रुपये किमतीचे पीठ प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे सुपूर्द केला. ही मदत ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाअंतर्गत देण्यात आली असून, या माध्यमातून मंगळवारी चिपळूणहून मदतीची पहिली गाडी पूरग्रस्त भागांकडे रवाना झाली आहे. यामध्ये ओंकार मित्र मंडळाने घेतलेली पुढाकाराची भूमिका उल्लेखनीय आहे.

गेल्या काही आठवड्यांतील अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांची शेती वाहून गेली असून, शेतकऱ्यांसमोर जगण्यासाठीची लढाई अधिकच कठीण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ओंकार मित्र मंडळाने दाखवलेली सामाजिक बांधिलकी ही प्रेरणादायी ठरत आहे. या मदत सुपूर्तीसाठी झालेल्या कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, माजी अध्यक्ष संजय चिपळूणकर, उपाध्यक्ष शशिकांत पवार, सहसचिव अक्षय केदारी, विजय उतेकर, सल्लागार संदीप चिपळूणकर, मंगेश पेढांबकर आदी सदस्य उपस्थित होते. मंडळाच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन एकमुखाने पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.