माजी एनएसजी कमांडो निघाला गांजा तस्कर, 26/11 हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढणाऱ्या बजरंग सिंगला अटक

देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी पाकिस्तानी दहशतवाद्यांशी मोठय़ा हिमतीने लढा देत त्यांच्याविरुद्ध दोन हात करणारा आणि हिरो ठरलेला माजी एनएसजी कमांडो बजरंग सिंगला गांजाची तस्करी केल्याप्रकरणी राजस्थानच्या दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि अमली पदार्थविरोधी कार्यदल (एएनटीएफ) यांनी अटक केली. गांजा तस्करीच्या मोठय़ा नेटवर्कचा मुख्य सूत्रधार हा बजरंग सिंग हाच आहे, असे पोलिसांनी सांगितल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

राजस्थानच्या चुरू येथून जवळपास दोनशे किलो गांजासह बजरंग सिंगला पोलिसांनी अटक केली. ओडिशा आणि तेलंगणा येथून गांजाची तस्करी करून राजस्थानमध्ये अवैध ड्रग्ज रॅकेट चालवल्याचा आरोप बजरंगवर आहे. ‘ऑपरेशन गांजनेय’ अंतर्गत दोन महिने पाळत ठेवल्यानंतर खबऱ्यांच्या मदतीने ही अटक करण्यात आली आहे. बजरंग सिंग हा मूळचा राजस्थानमधील सीकर जिह्यातील करंगा गावचा रहिवासी आहे. बजरंगने शिक्षण अर्ध्यावर सोडून देशाची सेवा करण्यासाठी सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) प्रवेश केला.

l बजरंगकडे असलेल्या कुस्तीच्या कौशल्यामुळे आणि उत्कृष्ट सेवेमुळे त्याची निवड राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) मध्ये झाली. एनएसजीमध्ये सात वर्षे विविध दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. या सात वर्षांच्या कार्यकाळात 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढणाऱ्या कमांडोंमध्ये त्याचा समावेश होता. 2021 मध्ये एनएसजीमधून निवृत्त झाल्यानंतर बजरंग सिंग वाईट मार्गाला गेला. गांजा तस्करीमध्ये सहभाग उघडकीस आल्यानंतर पोलीस त्याच्या मागावर होते.