
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची निवडणूक चार महिन्यांत घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक अधिकारी यांना दिले आहेत. तसेच न्यायालयाने निवृत्त न्या. पृथ्वीराज चव्हाण यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
गेल्या वर्षी असोसिएशनची निवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार व्हावी, अशी मागणी करत सातारा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनने अॅड. वैभव गायकवाड व रफिक सय्यद यांच्या मार्फत याचिका दाखल केली. न्या. महेश सोनक व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने सविस्तर सुनावणी घेऊन राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसारच निवडणूक घेण्याची सक्त ताकीद दिली. चार महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करा, असेही न्यायालयाने बजावले आहे. या निवडणुकीसाठी 70 वर्षे वयाची अट ठेवण्यात आली आहे.