
उपनगरी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ‘वीकेण्ड’ला मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर तसेच पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री हा ब्लॉक असेल. भायखळा स्थानकावर डीएसएस पॉइंट बदलण्यासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक तसेच पश्चिम रेल्वेवर माहीम ते सांताक्रुझ स्थानकांदरम्यान साडेतीन तासांचा जम्बो ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत दोन्ही मार्गांवरील काही फेऱ्या रद्द, तर काही फेऱ्यांच्या मार्गात बदल केला जाणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची चिन्हे आहेत.
पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री 1.00 ते पहाटे 4.30 पर्यंत माहीम आणि सांताक्रुझ स्थानकांदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गांवर जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक काळात ट्रक, सिग्नलिंग सिस्टम आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम केले जाणार असून मुंबई सेंट्रल आणि सांताक्रुझ स्थानकांदरम्यान सर्व डाऊन धीम्या मार्गावरील गाडय़ा डाऊन जलद मार्गावर चालवल्या जाणार आहेत.
भायखळा स्थानकावर डीएसएस पॉइंट बदलण्यासाठी शनिवारी मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 या वेळेत विशेष ट्रॅफिक ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे कोणार्क एक्स्प्रेस आणि हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्प्रेस या गाडय़ा दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत.