
अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांचा जबरदस्त फटका पालघरमधील मच्छीमारांना बसला आहे. समुद्रात खोलवर बोटी गेल्या, पण मासेमारीच खोळंबल्याने मच्छीमारांचे आर्थिक गणित कोलमडले असून सरकारने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी किंवा सानुग्रह अनुदान जाहीर करावी अशी मागणी कोळी युवाशक्ती संघटनेने केली आहे.
१ जून ते ३१ जुलै या काळात मासेमारी बंद होती. ती संपुष्टात आल्यानंतर १ ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात झाली. मासेमारीकरिता मच्छीमारांनी बोटी पाण्यात उतरवल्या त्यावेळी वातावरण काहीसे शांत होते. नव्या हंगामात चांगल्या प्रकारे मासेमारी करता येईल, अशी अपेक्षा असतानाच नारळी पौर्णिमेनंतर अचानक वादळी हवामान आणि अतिवृष्टी सुरू झाली. त्यामुळे मासेमारीत काही दिवसांचा खोळंबा आला. त्यानंतर मासेमारी सुरू झाली. मात्र पुन्हा गौरी-गणपतीच्या काळात खराब हवामानामुळे मासेमारी खोळंबली.
बोटींनी घेतला बंदरात
आश्रय वादळी हवामानामुळे अनेक बोटी समुद्रात अडकल्या. खोल समुद्रात गेलेल्या वसई, अर्नाळा, नायगाव, खोचिवडे, उत्तन येथील अनेक बोटींनी वादळाच्या काळात डहाणू तसेच गुजरातमधील बंदरात आश्रय घेतला. त्यानंतर काही दिवसाने मासेमारी पुन्हा सुरू झाली. मात्र नवरात्रोत्सव सुरू होताच पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अतिवृष्टी आणि वादळी हवामानामुळे मासेमारी खोळंबली. त्याचा मोठा फटका मच्छीमारांना बसला आहे.
मासेमारीकरिता डिझेल, बर्फ, जाळी तथा अन्य साहित्य यावर झालेला खर्च अक्षरशः वाया गेला, त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
मासेमारीकरिता खर्च जास्त आणि केलेल्या मासेमारीतून उत्पन्न कमी अशी बिकट परिस्थिती पारंपरिक मच्छीमारांची झालेली आहे. या सर्वांचा सहानुभूतीने विचार करून शासनाने ताबडतोब मच्छीमारांना सानुग्रह अनुदान जाहीर करावे अशी मागणी कोळी युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष मिल्टन सौदिया यांनी केली आहे.
किनाऱ्यावर येऊन पारंपरिक मच्छीमारांच्या नुकसानीची काय स्थिती आहे याची एकाही लोकप्रतिनिधीने माहिती घेतलेली नाही, अशी खंत मिल्टन सौदिया यांनी व्यक्त केली आहे.