
इटलीमध्ये सहकुटुंब फिरायला गेलेल्या नागपूरच्या एका प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाचा आणि त्याच्या पत्नीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात अख्तर दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे तर त्यांची एक मुलगी गंभीर जखमी आहे. इटलीमधील भारतीय दूतावासाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे नागपूरात एकच खळबळ उडाली आहे.
इटलीमधील ग्रोसेटो शहरात हा अपघात झाला. या अपघातात नागपूरच्या सिव्हिल लाइन्स परिसरातील जावेद अख्तर (55) आणि त्यांची पत्नी नादिरा गुलशन (47) यांचा मृत्यू झाला. तर त्यांची मोठी मुलगी आरजू अख्तर (22) गंभीर जखमी असून, धाकटी मुलगी शिफा अख्तर (20) आणि मुलगा जाजेल अख्तर (14) हेही जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी संपूर्ण अख्तर कुटुंब फॅमिली पिकनीकसाठी निघाले होते. यावेळी उत्तर दिशेकडे जाणाऱ्या कॅरेजवेवर त्यांची कार एका व्हॅनला धडकली. यामध्येच अख्तर दाम्पत्याचा मृत्यू झासा. अपघातानंतर मुलगा जाजेल अख्तर कारची खिडकी तोडून बाहेर पडला. आणि मदतीसाठी त्याने साइनबोर्डवर दिलेल्या हेल्पलाइन नंबरवर फोन करून स्थानिक प्रशासनाला अपघाताची माहिती दिली.
कोण आहेत जावेद अख्तर?
जावेद अख्तर हे नागपूरमधील सीताबर्डी येथील हॉटेल गुलशन प्लाझाचे मालक होते. अख्तर दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची बातमी नागपूरात कळताच संपूर्ण नागपूरातून शोक व्यक्त केला जात आहे.