
>> ह प्रा. शरयू जाखडी
संतसंगाने गंधीत झालेल्या मंगळवेढय़ाच्या भूमीवर कान्होपात्रा हिचा जन्म झाला. स्वर्गीय सौंदर्य लाभलेली कान्होपात्रा ही शामा नावाच्या गणिकेच्या पोटी जन्माला आली. शामा दिसायला सुंदर होती. तिचा गणिकेचा व्यवसाय उत्तम चालला होता. मंगळवेढय़ात मंदिराच्या पायरीवर बसून संतांची भजने, कीर्तन, भगवद्कथा हे सारे ऐकताना कान्होपात्रा हरवून जायची. शामाने कान्होपात्राला सांभाळण्यासाठी हंसा नावाची दाई ठेवली होती. हंसा विठ्ठलभक्त असून पंढरीची ती वारकरी होती. कान्होपात्राच्या आईला वाटायचे की, कान्होपात्राने आपल्याप्रमाणे गणिका होऊन अमाप पैसा कमवावा. तिने कान्होपात्रेला तसे सुचवून पाहिले, पण कान्होपात्रा विरक्त होती. तिला पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाची ओढ लागली होती. तिची दाई हंसा दरवर्षी वारीला पंढरपूरला जात असे. एक दिवस कान्होपात्राही तिच्या सोबत वारीत सामील झाली. प्रेमळ वारकऱयांच्या समवेत टाळ-मृदंगाच्या गजरात ती पंढरपूरला आली. पांडुरंगाला पाहताच तिला मायबाप भेटल्याचा आनंद झाला. ती म्हणाली, देवा विठ्ठला पांडुरंगा आता तुझे चरण सोडून मी कुठेही जाणार नाही. पंढरपूरी घडलेल्या अभूतपूर्व घटनांचा कथाभाग नंतर पाहू या.