
बांधकाम व्यावसायिकाचे चौघांनी अपहरण केल्याची घटना अंधेरीच्या वर्सोवा परिसरात घडली. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी चारजणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.
तक्रारदार महिला ही अंधेरीच्या चार बंगला येथे पती आणि तीन मुलांसोबत राहते. महिलेच्या पतीचा त्याच्या पहिल्या पत्नीच्या मुलासोबत संपत्तीवरून वाद सुरू आहे. रविवारी तिचा पती हा घरी होता. तेव्हा साध्या वेशातील चारजण आले. साहेबांनी बोलावले आहे असे सांगून ते त्यांना घेऊन गेले. कुठे घेऊन जात आहे अशी महिलेने विचारणा केल्यावर त्या चौघांनी काहीच उत्तर दिले नाही.
त्या चौघांनी महिलेच्या पतीला गाडीत बसवून नेले. रात्री महिलेने तिच्या पतीला फोन करून विचारणा केली तेव्हा ते चौघे त्यांना वसई येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. काही वेळाने महिलेने त्या नंबरवर फोन केला. तेव्हा तिच्या पतीचा फोन बंद येत होता. घडल्या प्रकरणी महिलेने वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पतीच्या अपहरणाची माहिती पोलिसांना दिली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी चारजणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.