पूरग्रस्तांना पर्यायी जमीन देण्यासाठी अभ्यास समिती; सोलापूरचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचा निर्णय

flood

सोलापुरातील मोडलेली शेती पुन्हा उभी करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सरसावले असून, शेतकऱयांना पर्यायी जमीन देण्यासाठी त्यांनी अभ्यास समिती गठित केली आहे. अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकुर यांच्या अध्यक्षतेखालची ही समिती पुनर्वसन कायद्याचा अभ्यास करून एका आठवडय़ात अहवाल देणार आहे. तो अहवाल जिल्हाधिकारी राज्य सरकारला पाठविणार आहेत.

अहिल्यानगर आणि धाराशीव जिह्यातील धरणातून मोठय़ा प्रमाणावर पाणी सोडल्याने सीना नदीला महापूर आला. महापुरामुळे शेतकऱयांची हातातोंडाला आलेली पिके वाया तर गेलीच, शिवाय पाण्याच्या वेगाने जमिनी खरडून गेल्या आहेत. खरडून गेलेल्या जमिनी पुन्हा लागवडयोग्य होण्यासाठी 10 वर्षांचा कालावधी लागणार आहे. यामुळे सीना नदीकाठचा शेतकरी पूर्ण मोडकळीस आला आहे.

अशा स्थितीत या शेतकऱयांना पुन्हा उभे करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यांच्या शेतातील माती पूर्णपणे खरडून गेली आहे, ज्यांचे कायमस्वरूपी नुकसान झाले आहे, त्यांना शेतीसाठी पर्यायी जमीन देऊन पुनर्वसन करता येईल का, याची चाचपणी केली जात आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती गठित केली आहे.

प्रत्यक्ष पंचनाम्यांनंतरच किती क्षेत्र खरडून गेले आहे, याचा अंदाज येणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतलेल्या या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे. जिल्हाधिकाऱयांच्या निर्णयाचा गैरफायदा मातीमाफियांनी घेऊ नये यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे, अशी मागणी आतापासूनच होत आहे.

धरण, तलावांतून माती मोफत देणार

पुरानंतर शेतीची भयावह स्थिती समोर आली. अनेक ठिकाणी शेतातील माती वाहून जाऊन त्या ठिकाणी 10-12 फुटांचा खड्डा पडल्याचे समोर आले. या शेतकऱयाला सरकारी नियमानुसार जरी मदत दिली, तरी त्यामुळे त्याचे झालेले नुकसान कधीच भरून निघणार नाही. त्यामुळेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱयांच्या शेतातील माती वाहून गेली आहे, त्यांना जवळच्या धरण किंवा तलावातून माती मोफत देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱयांनी घेतला आहे. गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, ‘मनरेगा’च्या माध्यमातून माती वाहून गेलेल्या शेतकऱयांना मोफत माती देण्यात येणार आहे.

11 हजार कुटुंबांना कीटचे वाटप

त्याचबरोबर पूरग्रस्तांची दिवाळी गोड आणि आनंदी करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. ‘डीपीडीसी’च्या निधीतून पूरग्रस्त भागातील 11 हजार कुटुंबांना दिवाळी किटवाटप करण्यात येणार आहे. तर, शासकीय कर्मचाऱयांनी वैयक्तिक मदतीतून तयार केलेले किटचेही वाटप सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते विविध गावांत हे किट वाटप सुरू झाले आहे.