सांगलीतील रस्त्यांची चाळण; निधीअभावी कामे रखडली

सांगली जिह्यातील बहुतांश सर्वच रस्त्यांची खड्डय़ांमुळे चाळण झाली आहे. मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. डांबराचा कुठेच पत्ता नाही. त्यामुळे धुळीच्या साम्राज्यातून वाहन चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. मात्र, जिह्याच्या पालकमंत्र्यांना या गंभीर समस्येकडे पाहायला वेळ नाही. निधीअभावी अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळेच रस्त्यांची कामे ठप्प झाल्याची चर्चा प्रशासन स्तरावर सुरू आहे.

सांगली जिह्यातील बहुतांश रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. सांगली शहरातील मुख्य रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे महापालिकेने दुरुस्त करण्याची मोहीम घेतली. मात्र, केवळ वरवरची मलमपट्टी करून ‘पुन्हा येणे रे मागल्या’ अशी अवस्था या रस्त्यांची झाली आहे. सांगली शहराप्रमाणेच जिह्याच्या ग्रामीण भागांतील सर्वच तालुक्यांत अनेक रस्ते नादुरुस्त झालेले आहेत. रस्ते नव्याने करण्यासाठी निधीच नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग हातावर हात मारून गप्प बसला आहे.

सांगली, कोल्हापूर या रस्त्यांवरील आकाशवाणीनजीकच्या खड्डय़ामुळे एका प्रवासी महिलेचा बळी गेला आहे. या रस्त्याची पाहणी नुकतीच जिल्हाधिकारी अशोक कामटे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी एका कंत्राटदारासमवेत केली. जिह्यातील अनेक शासकीय काम याच कंत्राटदाराच्या कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत होतात. या कंपनीच्या सांगली-मिरज रस्त्यांच्या कामाबाबत दोन महिन्यांपूर्वी जोरदार नागरिकांतून ओरड झाली होती.

फोडाफोडी हाच पालकमंत्र्यांचा एककलमी कार्यक्रम सुरू

 सांगली जिह्याच्या या गंभीर प्रश्नाकडे बघायला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना वेळ नाही. कोणत्या पक्षातून कोणाला आपल्या पक्षात घ्यायचा हा एककलमी कार्यक्रम सध्या ते राबवित आहेत. त्यामुळे जिल्हातील अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिह्यातील व शहरातील रस्त्यांचा सर्व्हे करून अहवाल पाठवला आहे. मात्र, निधी अभावी हे काम थांबले आहे.