पुढील उन्हाळ्यापासून पंजाबमध्ये लोडशेडिंग होणार नाही, आप नेते अरविंद केजरीवाल यांची घोषणा

पुढील उन्हाळ्यापासून पंजाबमध्ये लोडशेडिंग होणार नाही अशी घोषणा आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली. पंजाबमध्ये वीज क्षेत्रातील सुधारणांचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे असेही केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सोबत वीज प्रसारण आणि वितरण युनिटच्या पायाभरणी सोहळ्यानंतर ते लोकांना संबोधित करत होते. तेव्हा केजरीवाल म्हणाले की, पंजाबमधील 90 टक्के लोकांना मोफत वीज मिळते, असे केजरीवाल म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ठराविक मर्यादेपर्यंत वीज बिल माफ केले होते, हेही त्यांनी सांगितले. पंजाबमधील शेतकऱ्यांना सिंचनासाठी किमान आठ तासांचा वीजपुरवठा मिळतो आणि लवकरच ती वेळ वाढवून दिवसभरासाठी वीज उपलब्ध करून देण्यात येईल. आता आम्ही पुढच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. राज्यात 24 तास वीजपुरवठा सुनिश्चित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

केजरीवाल यांनी सांगितले की पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणात 25 हजार किलोमीटर नवीन वीज केबल टाकणे, 8 हजार नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे आणि 77 नवीन उपकेंद्रे उभारणे यांचा समावेश आहे. पायाभूत सुविधा उन्नतीकरणाचे काम प्रचंड प्रमाणावर सुरू आहे. संपूर्ण प्रणाली आधुनिक करण्यात येत आहे. पुढील उन्हाळ्यात पंजाबमध्ये वीज कपात होणार नाही,” असा दावा त्यांनी केला.